Breaking

जुन्नर : श्री शिवछत्रपती महाविद्यालयात 'निर्भय कन्या' अभियाना अंतर्गत एकदिवसीय व्याख्यानमाला संपन्न


जुन्नर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर, विद्यार्थी विकास मंडळ व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी निर्भय कन्या अभियानांतर्गत ऑनलाइन एकदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यात वेगवेगळ्या विषयांवर तीन व्याख्यात्यांनी प्रभावी असे मार्गदर्शन केलं. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. आर. मंडलिक उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही.बी. कुलकर्णी उपप्राचार्य डॉ.डी. व्ही. उजगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य मंडलिक म्हणाले की, स्त्री ही अबला नसून सबला आहे. ब्रिटिश काळात राजाराम मोहन राय यांनी अनिष्ट रूढी आणि परंपरा मधून स्त्रियांची मुक्ती केली आणि खऱ्या अर्थानं स्त्री मुक्ती चळवळीची सुरुवात केली. 

स्त्री आज विविध क्षेत्रात आणि विविध ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा प्रभावीपणे उमटवत आहे. समाजातील स्त्रियांचा सहभाग हा महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसत आहे. स्त्री सुरक्षितता जपण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 'निर्भय कन्या' अभियानाच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रमाची सुरुवात झाली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येईल, असेही मंडलिक म्हणाले. 

या कार्यक्रमातील व्याख्यात्या बी.जे. महाविद्यालय आळे येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुषमा कदम म्हणाल्या की, स्त्रीला सक्षम करण्यावर भर देणे आज गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शाळा आणि महाविद्यालय पातळीवर त्यासाठी भरीव कार्य करण्याची गरज असून स्त्रीला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनवणे हेच मोठे आव्हान या पुढच्या काळामध्ये असेल असे त्या म्हणाल्या. 

तर विशेष सरकारी अभियोक्ता पुणे जिल्हा येथील  अँड.चैताली भोसले यांनी कायदेविषयक प्रश्न, कायदेविषयक माहिती यावर भर देऊन अनेक क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या समस्या सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजून दिल्या. कायद्याविषयक जाणीव जागृती निर्माण करून कायदाविषयक असलेली भीती नाहीशी करणे गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. महिलांविषयी असणारे कायदे आपल्याला ज्ञात असावेत, त्यासाठी शाळा-महाविद्यालयीन पातळीवर प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं. स्त्रियांनी समाजातील घटनांकडे सजग दृष्टीने पाहणे गरजेचे आहे व कुटुंबातील घटकांत देखील सुसंवाद हवा तरच स्त्री सुरक्षितता निर्माण होण्यास मदत होईल, असेही त्या म्हणाल्या. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील  क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले स्त्री व लिंगभाव अभ्यास विभागातील प्रा.डॉ.ललित भवरे यांनी देखील याप्रसंगी व्याख्यान दिले. ब्रिटिशांनी त्यांच्या चालीरीती व संस्कृतीचा प्रभाव नकळतपणे आपल्यावर टाकला व भारतीय रूढी-परंपरा आणि संस्कृतीतील बुरसटलेल्या विचारांवर बोलण्याचे काम प्रथमता ब्रिटिशांनी केलं. व्यक्ती जर शिक्षित झाला तर तो ज्ञानाच राजकारण करेल व जागृत होईल, असा विश्वास महात्मा फुले यांना होता. म्हणूनच फुले दांपत्य आणि विशेषतः सावित्रीबाई फुले या व्यक्ती म्हणून देखील महान होत्या असं प्रा.भवरे म्हणाले. 

स्त्री चळवळीची लाट ब्रिटिश काळामध्ये आली आणि त्यानंतर ती जोमाने वाढली व संपूर्ण भारतभर पसरली आणि त्यातूनच पुढे दलित, आदिवासी स्त्रियांच्या स्वायत्त संस्था चळवळीतून उभ्या राहिल्या. भारतातल्या स्त्री चळवळीचे वेगवेगळे टप्पे असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी याप्रसंगी बोलताना केले.


सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.सचिन कसबे यांनी केलं तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया काळे यांनी केलं. तर पाहुण्यांचा परिचय व आभार प्रा.संकेत वामन यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध  विभागातील महिला प्राध्यापक वृंद, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा