Breaking

केंद्र सरकारचा महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी केला निषेध


पिंपरी : पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राचा अपमान करणा-या मोदी, शहा यांना आगामी काळात जनता घरी बसवेल. केंद्र सरकारच्या विरोधात टिका टिपणी करणा-यांच्या मागे बेकायदेशीरपणे इ.डी., आय. टी. आणि सी. बी. आय. चा ससेमिरा लावला जातो. कुटिल राजकारण करुन लोकशाहीचा गळा घोटणा-या भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात गो-यांच्या विरोधात लढा उभारला होता. आता मोदी, शहा आणि भाजप सारख्या चोरांच्या विरोधात देशभर लढा उभारुन जनतेने त्यांना घरी बसवावे असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.


केंद्रिय तपास यंत्रणांनी दोन दिवसांपुर्वी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना मुंबईत अटक केली. त्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि. २५ फेब्रुवारी) पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सायंकाळी महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांनी केंद्र सरकारचा व भाजपचा निषेध करीत आंदोलन केले. 


यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेना शहराध्यक्ष सचिन भोसले आदींसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रिय तपास यंत्रणांच्या विरोधात ‘गांधी लढे थे गोरोंसे, अब लढणा है चोरोंसे’  अशा घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
 

डॉ. कैलास कदम, अजित गव्हाणे, सचिन भोसले, संजोग वाघेरे, भाऊसाहेब भोईर, कविता आल्हाट, उर्मिला काळभोर, रविकांत वरपे, नरेंद्र बनसोडे, माधव मुळे, छायाताई देसले आदींनीही केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करणारे भाषण केले.

- क्रांतिकुमार कडुलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा