Breaking


जुन्नरला सातवाहन कालीन मातीच्या भांड्याचे अवशेष आढळले


जुन्नर : कुकडी नदी तीरावर दिल्लीपेठ, गोळेगांव परिसरात  भटकंती करत असताना सातवाहन काळातील भाजलेल्या मातीच्या भांड्याचे व वैशिष्ट्यपूर्ण कौलाचे अवशेष आढळून आले असल्याची माहिती प्राचीन इतिहास अभ्यासक बापुजी ताम्हाणे यांनी दिली.


याविषयी माहिती देताना ताम्हाणे म्हणाले, जुन्नर परिसरातील सातवाहन काळात घरांच्या छप्परांवर एक विशिष्ट प्रकारची भाजलेल्या मातीची कौले असत. ही कौले आयताकृती असून त्यांना वरच्या भागात पन्हाळ्या केलेल्या दिसून येतात. या कौलांना वरच्या अंगास दोन छिद्रे असून त्यातून ती लाकडी वाशांना पक्की बसविण्यात येत असावीत. या कौलाना दिलेला उतार तसेच त्यावर काढलेल्या पन्हाळी यावरून जुन्नर परिसरात सातवाहन काळात अधिक पाऊस पडत असावा असे अनुमान काढता येते.


जुन्नरच्या सातवाहन कालीन लोकवस्ती स्थळातून मोठ्या संख्येने आढळणारा पुरावा म्हणजे भट्टीत भाजलेली मातीची भांडी होत. ह्या भांड्याचे महत्त्व पुरातत्त्वीय संशोधनात इतके अनन्यसाधारण आहे की, त्याना "पुरातत्त्वीय मूळाक्षरे" असे संबोधिले जाते.

- बापुजी ताम्हाणे,
  जुन्नर प्राचीन इतिहास अभ्यासक


जुन्नर परिसरातील लेण्यात बौध्द भिक्खू निवास (वर्षावास) करत असतील त्यांना भिक्षेसाठी, निर्वाहासाठी आश्रय देणाऱ्या सातवाहन काळातील लोकवस्त्या कुकडी नदीच्या तीरावर दिसून येतात. जुन्नर परिसरातील सातवाहन काळात भाजलेल्या भट्टीतील मडकी, वाडगे, डिश,थाळ्या, लहान आकाराची बुरकुळी इत्यादी भांडी शेकडो वर्षे मातीत गाडून देखील आहे तशीच राहिल्याने या भांड्याचा पुरावा व त्यांचा अभ्यास फार महत्वपुर्ण ठरतो.

सातवाहन काळात माती मळण्याची पध्दत, भांड्याची घडण, भांडे भाजण्याची रीत ,भांड्याचे प्रकार यांत उत्तरोत्तर विकास झालेला दिसून येतो. सातवाहन काळातील काही भांडी सर्वसामान्याच्या दररोजच्या वापरातील असल्याने या अवशेषांचे सूक्ष्म अवलोकन व अध्ययन करून  प्राचीन  प्राचीन संस्कृतीचे ज्ञान मिळवता येते असे ताम्हाणे यांनी सागितले.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा