Breaking

घरफोड्यांच्या संदर्भात पोलिसांना अनावृत्त पत्र....


प्रिय पोलिस,


लहानपणी गर्दीमध्ये कोणी खाकी गणवेशातील व्यक्ती दिसली की आपसूक हाक निघायची, 'पोलिस मामा'... त्या हाकेमध्ये एक आपुलकी आणि विश्वासार्हता असायची. आज या दोन्ही गोष्टी हरवून बसल्या आहेत. 

उस्मानाबाद शहरात, जिल्ह्यात घरफोड्यांच्या सत्राने हाहाकार माजविला आहे. जीवाची अन् मालमत्तेची धास्ती सर्वत्र पसरलेली आहे. अशा परिस्थितीत पोलिस यंत्रणा अकार्यक्षम आणि हतबल झालेली दिसत आहे. "सद् रक्षणाय खल निग्रणाय" या बिरुदावल्या फक्त शोभेच्या होऊन राहिल्या आहेत. जनतेच्या अपेक्षा खूप साध्या आहेत - कुटुंबाची सुरक्षितता आणि निर्धास्त झोप.

त्यासाठीच आपल्यातीलच एक व्यक्ती जनता निवडते, त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा, माहिती, प्रशिक्षण इ. सर्व काही पुरवून पोलिस नावाची एक सक्षम यंत्रणा तयार होते. त्या यंत्रणेकडून जनता अपेक्षा करते की जेंव्हा आम्ही हतबल होऊ, जेंव्हा आम्ही त्रासात असू तेंव्हा आमच्या हाकेला ओ देणारी सुसज्ज यंत्रणा हजर राहील.

आज ही विश्वासार्हता आणि कार्यक्षमता पोलिस यंत्रणेमध्ये आहे का? याचा विचार पोलिसांनी करायची निकड आहे.

शहरामध्ये ठिकठिकाणी लोकांनीच पोलिसांच्या भरवशावर न राहता आपापली गस्त पथके सुरू केली आहेत. पोलिस यंत्रणेसाठी ही शरमेची बाब तर आहेच परंतु ही एक अत्यंत भयावह गोष्ट आहे. कारण ही गोष्ट आपण एका अराजकतेच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे द्योतक आहे. लोकशाही यंत्रणा कुचकामी ठरत असून जनतेला स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःच रस्त्यावर उतरावे लागणे हे घातक चित्र आहे.

आज लोक टॉर्च, काठ्या, शिट्ट्या अशी सामान्य शक्य ती साधने घेऊन गस्त घालत आहेत. भविष्यात पोलिसांनी अशीच कर्तव्यात कसूर करीत गेल्यास, भीती वाढत जाईल आणि लोकांना हिंसक हत्यारे घेऊन गस्त घालावी लागेल.

कायदा अन् सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घरफोड्यांचे सत्र तत्काळ रोखणे अगत्याचे आहे. लोकशाही यंत्रणांच्या कुशाग्र बुध्दी आणि तत्परतेवर कार्यान्वित होत असते.

जनतेमध्ये पोलिस यंत्रणा विश्वास गमावत चालली आहे. आपण लवकर कार्यान्वित होऊन चोरांचा बंदोबस्त करावा, हे कळकळीचे आवाहन आहे. "पोलिस आहेत, आपण ताण घ्यायचं काही कारण नाही." असं म्हणून निर्धास्त झोप यावी, हीच जनतेची माफक इच्छा आहे.

जनता घाबरलेली आहे, जीव मुठीत घेऊन जगत आहे. आम्हाला आमचं निवांत आयुष्य परत हवं आहे.
९० नंतर सगळीच सरकारे नवउदारमतवादी धोरणांच्या आहारी जाऊन सगळ्या क्षेत्रात खाजगीकरण करत आहेत; यंत्रणेची अकार्यक्षमता पाहून पोलिस यंत्रणेचे सुध्दा खाजगीकरण होऊ नये म्हणजे मिळवलं.

- सुदेश इंगळे
प्रसिद्ध साहित्यिक आणि मार्क्सवादी अभ्यासक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा