Breaking

विभागीय आयुक्त कार्यालयावर 5 हजार कामगारांचा पुण्यात मोर्चा


पिंपरी चिंचवड : शहरातील कामगार संघटना संयुक्त कृती समिती, पुणे च्या नेतृत्वाखाली देशव्यापी कामगार संपाला पाठिंबा देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून पिंपरी येथुन विभागीय आयुक्त कार्यालय पुणे पर्यंत भव्य दुचाकी वाहनांची रॅली काढून विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर दोन दिवसांचे धरणे आंदोलन करण्यात आले.


या आंदोलनात पुणे जिल्ह्यातील विविध कामगार संघटना सहभागी झाल्या. मंचावर सिटु चे कॉम्रेड अजित अभ्यंकर, इंटक चे डॉ.कैलास कदम, स्वराज अभियानचे अध्यक्ष मानव कांबळे, आयटक अरविंद जक्का, श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकळे, समाजसेवक मारुती भापकर, कामगार नेते अनिल रोहम, उपस्थित होते.

केंद्र सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये पावसाळी अधिवेशनात एकतर्फी पूर्वीचे कामगार कायदे बदलून एकूण चार कायदे समंत केले. अनिर्बंध खाजगिकरण कंत्राटीकरणाला प्रोत्साहन देणारे आणि कार्पोरेट धार्जिणे हे कामगार कायदे आहेत. गेली दोन वर्षे देशभरात कामगार संतप्त आंदोलने करत आहेत. सिटू, आयटक,  इंटक, बँक, पोस्ट, संरक्षण उत्पादन, रेल्वे, दळणवळण सह सरकारी उद्योगातील कामगार संघटना या कायद्याविरोधात राष्ट्रीय पातळीवर एका व्यासपीठावर कायदे मागे घ्या हीच भूमिका घेऊन लढत आहेत.

दोन दिवसांच्या धरणे आंदोलनात पुणे, पिंपरी चिंचवड मधील कामगार नेत्यानी आता महागाई विरोधात केंद्र सरकार विरोधात दंड थोपटले आहेत. पेट्रोल, डीझेल, गॅसच्या दरवाढीचा आजच्या आंदोलनात निषेध करण्यात येत आहे.

- क्रांतिकुमार कडुलकर
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा