Breaking

आकुर्डीत एक दिवसीय पद्मश्री नारायण सुर्वे कष्टकरी साहित्य संमेलन


पिंपरी चिंचवड : कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय पद्मश्री नारायण सुर्वे कष्टकरी साहित्य संमेलन शनिवार, दिनांक 26 मार्च रोजी सकाळी साडे आठ वाजता श्रमशक्ती भवन, बजाज ऑटोसमोर, आकुर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिली आहे.


ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक, 'पानिपत'कार विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उद्योजक रंगनाथ गोडगे-पाटील स्वागताध्यक्ष असून केंद्रीय किमान वेतन आयोगाचे सदस्य चंदनकुमार,नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी अध्यक्ष सुदाम भोरे,ज्येष्ठ कामगार नेते शिवाजीराव खटकाळे, माजी संमेलनाध्यक्ष तुकाराम धांडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. संमेलनाच्या पहिल्या सत्रात 'आयुष्याची वाट तुडवताना.' या कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ चित्रपटनिर्माते, विडंबनकार रामदास फुटाणे यांची मुलाखत कवी भरत दौंडकर घेतील.


कविवर्य उद्धव कानडे यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या सत्रात 'घामाचे गाव' हे  कवींचा सहभाग असलेले कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनात सुमारे अकराशे वेळा डायलिसीसला सामोरे जाणारे कविवर्य माधव पवार आणि कामगारभूषण पुरस्कार जाहीर झालेले राजेंद्र वाघ यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. भोजनोत्तर 'कष्टकऱ्यांच्या जीवनात नवी पहाट केव्हा उगवेल?' या चर्चासत्रात पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार, वरिष्ठ व्यवस्थापक, सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते सहभागी होतील.

एकूण चार सत्रात हे संमेलन होणार आहे. तिसऱ्या सत्रात " कष्टकऱ्यांच्या जीवनात नवी पहाट केव्हा उगवेल" या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. यामध्ये शहरातील नामवंत पत्रकार जयंत जाधव, अविनाश चिलेकर, विश्वास मोरे, सुरज व्यास, अनिल कातळे, नंदकुमार सातूर्डेकर, क्रांतिकुमार कडुलकर तसेच मानव संसाधन तज्ञ सूर्यकांत मुळे, साहित्यिक निवेदक श्रीकांत चौगुले, कामगार नेते किशोर ढोकळे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर सहभाग घेणार आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा