Breaking


भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात याचिका दाखल केलेल्या वकिल सतीश उके यांच्या घरावर ईडीचे छापे


नागपूर : महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री आणि पक्षाचे नेते सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) घ्या रडरावर आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या निवासस्थानावर छापा टाकून ईडीने त्यांना ताब्यात घेतले.

अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक सकाळी ६ वाजता नागपुरातील वकील सतीश उके यांच्या पार्वतीनगर भागात असलेल्या घरी छापे टाकले. केंद्रीय राखीव पोलीस (CRPF) जवानांसह कडेकोट बंदोबस्तात हे पथक दाखल झाले. नागपुरातील एका जमीन खरेदी व्यवहाराबद्दल ईडीने हे छापे टाकले असल्याचे बोलले जात आहे. या छाप्यानंतर वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतले.

सतीश उके यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या आहेत. त्यांच्या एका अर्जात त्यांनी फडणवीस यांच्यावर निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी प्रकरणे उघड न केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती.

या कारवाईवरून नाना पटोले यांनी एक ट्विट करत सरकारवर टिका केली आहे. पटोले यांनी ट्विटर मध्ये म्हटले आहे की, "मोदींच्या राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी धोरणांविरुद्ध जो आवाज उठवेल, त्याचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरूपयोग करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करेल, असा संदेश दिला जात आहे. पण आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू."

आता ईडीच्या अधिकार्यांना उके यांच्या विरोधात नेमके कोणत्या गैरव्यवहाराचे कोणते पुरावे सापडतात?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा