Breaking

विशेष लेख : दुसऱ्या साम्राज्यवादी महायुद्धानंतरची मानवी शोकांतिका, 30 लाख युक्रेनियन निर्वासित


युद्ध टाळता आले असते !


रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेले युद्ध अतिशय विदारक आहे. आतापर्यंत युद्धाच्या भीतीपोटी तब्बल तीस लाख लोकांनी युक्रेन सोडल्याची माहिती युक्रेन प्रशासनातील एका उच्चपदस्त अधिकाऱ्याच्या वतीने देण्यात आली आहे. कीव्ह, खार्किव्ह, सुमी ई मोठ्या शहरातील उपनगरांमध्ये जोरदार बॉम्बफेक सुरू आहे. रशियन सैन्य दिवस-रात्र बॉम्ब वर्षाव करत आहे. हजारो मृतदेह ताब्यात घेता आलेले नाहीत. भटकी कुत्री मृतदेहांभोवती फिरत असून, हे चित्र खूपच विदारक आहे,' अशी प्रतिक्रिया कीव्हचे महापौर अनातोल फेडोरुक यांनी व्यक्त केली.

लक्षावधी युक्रेनियन पोलंडमार्गे युरोप मध्ये गेले आहेत. अतिशय समृद्ध, उचभ्रू जीवन जगणाऱ्या युक्रेनच्या निर्वासित लोकांना अन्न, आरोग्य, निवारा, वाहतूक सुविधा देताना पोलंड आणि युरोपियन देशांची दमछाक होत आहे. नाटो सैन्य संघटना आणि रशिया यांच्या वादाचे रूपांतर भयानक युद्धात होईल असे सामरिक तज्ज्ञांना वाटले नव्हते. युक्रेन रशिया युद्धात आतापर्यंत 30 लाख नागरिक निर्वासित झाले आहेत. दुसऱ्या महायुद्धात सुद्धा तुलनेने हीच आकडेवारी होती.

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो राष्ट्रांनी लिबिया, इराक, सोमालिया, येमेन, ट्युनिशिया, लेबीनॉन,
अफघानीस्तान येथे युद्ध करून राखरांगोळी केली होती. सीरिया, अफगाणिस्तान येथे नाटो आणि  अमेरिकेचा मानवी संहार आणि त्यामुळे युरोपात गेलेले कोट्यवधी निर्वासित याचा इतिहास जगाने पाहीला आहे.

युरोपियन देशातील फ्रांस, जर्मनी, इंग्लड, इटली, तुर्कस्तान, नॉर्वे, स्वीडन इ देशातील सरकारानी युरोप बाहेर पश्चिम अशिया, गल्फ, आफ्रिका येथे युद्धे लादून स्वतःच्या शस्त्रांची विक्री केली. मात्र युक्रेन युद्ध युरोपियन युनियनच्या जागतिक धोरणाचा पराभव आहे. 1991 पासून शांत आणि संयमित असलेल्या ब्लदिमिर पुतीन यांची युक्रेनच्या मार्फत कळ काढल्यामुळे युरोप पुन्हा भीषण युद्धाच्या खाईत सापडला आहे.


अतिरेकी उजव्या राष्ट्रवादाचे भीषण स्वरूप

जगातील विविध देशातून युरोपमध्ये निर्वासित होणाऱ्या नागरिकांची संख्या 2003 च्या इराक युद्धापासून सुरू झाली. इराक ते युक्रेन पर्यंतच्या निर्वासितांच्या इतिहासाचे प्रमुख कारण उजव्या शक्तींनी सुरू केलेली कारस्थाने आहेत. इराक, सीरिया, सुदान, अफगाणिस्तान युद्धाने निर्वासित समस्या दखल घेण्याइतकी वाढली. या निर्वासितांचे पालन पोषण करण्यासाठी किमान 26 हजार(316 युरो) इतका खर्च युरोपियन देशांना करावा लागतो. गल्फ, आफ्रिका, पश्चिम आशिया येथे समृद्ध जीवन शैली लोक सुद्धा 1990 पूर्वी चांगले जीवन जगत होते.

इराक, सीरिया, लिबिया या देशातील राज्यव्यवस्था हुकूमशाही होती. ते तेलसंपन्न होते. परंतु तेथील नागरिकांना शिक्षण, आरोग्य, खाण्याची भ्रांत नव्हती.
सोव्हिएत युनियनच्या विघटनानटतर अमेरिकेने लोकशाही, स्वातंत्र्य, मानवी हक्क इ नावाखाली या सर्व देशात अरब स्प्रिंग, पिंक, यलो क्रांती च्या नावाखाली धुमाकुळ घालायला सुरवात केली.

अमेरिकन साम्राज्य वादी लोकशाही संकल्पना,तेथील समृद्धीचे आकर्षण जगभर पसरले, त्यातून गल्फ मध्ये 2011 साली समृद्ध इराक, येमेन, सीरिया, लिबियामधील मध्यमवर्गाने भावनिक आंदोलने सुरू केली. अरब स्प्रिंग म्हूणून ही आंदोलने गाजली, भारतात 2011 सालचे अण्णा आंदोलन तशाच प्रकारचे होते. हे सर्व 2003 सालापासून रशिया शांतपणे अमेरिका आणि नाटोचा धुमाकूळ सहन करत होता.

नाटोची भीती आणि पुतीन यांची चाल

अफगाणिस्तान मध्ये रशियाचे पानिपत झाले. रशियाची आर्थिक, राजकीय स्थिरता पुतीन यांच्या कारकिर्दीत निर्माण झाली. मात्र अमेरिका आपल्यामागे हात धुऊन लागेल याची जाणीव ब्लादिमिर पुतीन यांना होती. ते केजीबी या बलाढ्य गुप्तहेर संघटनेचे प्रमुख होते. जगातील कोणतीही घडामोड अमेरिकन तेल, वायू, संरक्षण उत्पादन उद्योगासाठी फायद्याची असते हे पुतीन यांना माहीत होते. अमेरिकी हेरखात्याने जॉर्जिया मध्ये रशियाविरुद्ध पहिला हस्तक्षेप केला. 

नाटोचा विस्तार करून रशियन गॅस, तेल, आयुधे आणि इतर उत्पादनाची कायम स्वरूपी अडवणूक करावी ही अमेरिकेची योजना जॉर्जियात पुतीन यांनी अपयशी ठरवली. कित्येक दशकापासून व्यापारी, सांस्कृतिक, भौगोलिक दृष्ट्या रशिया युरोपशी जोडला गेला आहे. नाटो मार्फत होणारी कोंडी तोडण्यासाठी 2008 पासून पुतीन यांनी राजनैतिक प्रयत्न केले होते. त्यांचा युरोपियन युनियनला विरोध कधीच नव्हता. फ्रांस, जर्मनी, इटली, इंग्लड, तुर्कस्तान सह इतर युरोपियन कंपन्या रशियात काम करत होत्या. युरोप रशिया यांची आर्थिक,व्यापारी मैत्री कायम टिकली तर नुकसान अमेरिकेचे होत होते.

युक्रेनचा अविवेकी राष्ट्रवाद आणि नाटोचा रशियाभोवती फास

गेल्या काही दशकभरात कीव्हमध्ये पाश्चिमात्य युरोपवादी विचारांचा प्रभाव वाढत गेला आहे. त्यामुळे रशियावादी आणि युरोपवादी असे दोन गट युक्रेनमध्ये पडले. गेली 30 वर्षे अमेरिका रशियाला शत्रू ठरवत आहे, असा शत्रू दाखवला नाही तर नाटोचे अस्तित्व समाप्त होईल. परिणामी युरोपमधील अमेरिकेचा प्रभाव कमी होईल, युरोप रशियाकडे झुकेल,असे अमेरिकेला वाटू लागले. युरोपच्या सुपर पॉवर जर्मनीने नैसर्गिक वायूसाठी रशिया बरोबर करार करून एक मोठी नॉर्द स्ट्रीम 2 गॅस पाईपलाईन पूर्ण केली. त्यामुळे रशियन कंपन्यांचे मोठे जाळे युरोप मध्ये पसरणार होते. इथे अमेरिकेने युक्रेनच्या राज्यकर्त्यांना हाताशी धरले.

युक्रेनचे महत्व अधोरेखित करता येईल अशी भौगोलिक रचना आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात शेकडो वर्षांपासून सांस्कृतिक आणि भाषिक संबंध आहेत. युक्रेन हा रशियानंतर सोव्हिएत युनियनमधील सर्वात शक्तिशाली देश आहे. युक्रेन हे व्यावसायिक उद्योग, कारखाने आणि संरक्षण उत्पादनाचे केंद्र राहिले आहे. युक्रेन रशियाला काळ्या समुद्रात प्रवेश आणि भूमध्य समुद्राला महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी युक्रेन मधून मिळते. युक्रेन खनिज, शेती, वायू, तेल संपन्न देश आहे, येथे लिथियम, कोळसा याचे साठे भरपूर आहेत. त्यामुळे अमेरिकेची नजर या देशावर सोव्हिएत विघटनांपासून होती.

रशियन विरुद्ध युक्रेनियन अस्मितांच्या या टकरीतून लोकशाहीला आवश्यक असा सामाजिक सलोखा कधीच निर्माण झाला नाही. यातून 2004 ची ऑरेंज क्रांती किंवा 2014 ची युरोमेडान चळवळ झाली. येथे भाषिक आणि पंथीय मतभेद सुरू झाले. 2014या ‘जनआंदोलनात’ अमेरिका आणि पाश्चिमात्य देशानी हस्तक्षेप करून युक्रेनला रशियापासून तोडायचे कारस्थान यशस्वी केले. 

किव्ह ते मास्को हे अंतर 700 किमी आहे.युक्रेनला युरोपियन युनियनमध्ये सामील करावे,त्यानंतर नाटो मध्ये प्रवेश देऊन अमेरिकेला रशियाची कायम स्वरूपात कोंडी करायची होती. त्यासाठी अमेरिका,नाटोचे महाबलढ्य सैन्य तळ इस्टो निया, लाटविया, लिथुआनिया, पोलंड, हंगेरी या देशात उभे करण्यात आले. अमेरिकेला युक्रेन मध्ये नाटोचे तळ उभे करायचे होते. सोव्हिएत युनियनच्या विघटनामध्ये अमेरिकेने केलेले कारनामे पुतीन यांनी अनुभवलेले होते.युक्रेनचा वापर रशियाविरोधात होणार, याची जाणीव जॉर्जियन युद्धात पुतीन याना झाली होती. यातूनच रशियन बहुभाषिक क्रिमियामध्ये सैन्य घुसवून रशियाने त्याचा ताबा घेतला. अर्थात यामुळे रशियाला दळणवळणासाठी महत्त्वाच्या अशा काळ्या समुद्राला थेट रस्ता मिळाला आणि तिथलं महत्त्वाचं बंदर ताब्यात आलं, हेही खरंच. एकेकाळी सोव्हिएत रशियाच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी पश्चिम युरोपमधल्या देशांनी नाटो या संस्थेची स्थापना केलेली होती.

2019 मध्ये ब्लादिमिर झेलन्की युक्रेनचे राष्ट्रपती झाले. ते एक सुप्रसिध्द कोमेडियन अभिनेते होते.लोकप्रिय होते. युक्रेनच्या लोकांना युरोपियन युनियनचे आकर्षण होते. युक्रेनची एकूण लोकसंख्या 4 कोटी. युक्रेन गव्हाचे कोठार, सूर्यफूल, तेलबिया, पालेभाजी, फळे यांनी समृद्ध युक्रेनियन अतिशय सुंदर जीवन जगत होते. 2004 पासून परकीय माध्यमांनी तिथे रशियन फोबिया पसरवण्यास सुरवात केली. एकेकाळी रशियाचा भाग असलेल्या युक्रेनियन वंशाच्या नागरिकांमध्ये रशियन हे शत्रू आहेत अशी भावना निर्माण करण्यात आली. 

पाश्चिमात्य प्रसार माध्यमांनी रशियाविरोधात युक्रेनियन आणि रशियन वंशाच्या लोकांमध्ये दुफळी निर्माण केली. गेल्या काही दशकात जगातील मोठी युध्द भेदभावनेतून खेळली गेली. शिया सुन्नी, तामिळ सिंहली, हिंदू मुस्लिम अशा प्रकारची ही भेदनीती होती. युक्रेन - युक्रेनियन राष्ट्रवाद टोकदार झाला. आम्हाला पण नाटो मध्ये सामील व्हायचे आहे, तो आमचा हक्क आहे. त्यासाठी अमेरिकेचा लष्करी तळ, क्षेपणास्त्रे युक्रेन मध्ये राहिली तरी चालतील. पोलंड, लिथुआनिया, लाटविया, ईस्तोनिया या रशिया भोवतालच्या देशामध्ये असे तळ आहेत.

युक्रेनला समज यावी यासाठी वारंवार मिन्स्क कराराची आठवण पुतीन यांनी करून दिली होती. युरोपचा नैसर्गिक वायू, क्रूड पुरवठा युक्रेनच्या भूमीवरून रशिया करत होता. युक्रेन अमेरिका, नाटोच्या कारस्थानाचा बळी ठरला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की ऐकून घेत नाहीत. त्यांच्या अविवेकी राष्ट्रवाद रशियाला परवडणार नव्हता. 2020 मधेच युक्रेनच्या अध्यक्षांनी नाटो मध्ये सामील न होण्याची भूमिका घेतली असती तर आज युक्रेन बरबाद झाला नसता.

खरकीव, लुहान्स, मारियोपोल, चेर्नोबिल, खेरसन,  आदी महत्त्वाची औद्योगिक आणि आर्थिक शहरे, संपूर्णपणे बेचिराख झाली असून त्यांची वाताहत झाली आहे. पडझड झालेल्या इमारती, ओसाड पडलेले रस्ते आणि गावे आहेत. शहरभर आगीचे लोळ उठत असून त्यासमवेत राजधानी कीवही अर्धीअधिक उद्ध्वस्त झाली आहे. लाखो नागरिकांना निर्वासिताचा शिक्का मारून आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये मानहानीकारक प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे लाखो निर्वासितांचा पुष्कळ मोठा प्रश्न जगासमोर उभा रहाणार आहे. युरोप मध्ये इंधन, गॅस दरवाढ होत आहे. मोठ्या महागाईची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांचे नुकसान झालेले आहे. युक्रेन युद्धामुळे अमेरिका, फ्रांस या देशातील शस्त्र उद्योगाचा धंदा तेजीत आहे.
 
एकदा युद्ध सुरू झाल्यावर ते मानवी हक्क, जागतिक शांतता याचे कीर्तन ऐकायला तयार नसतं. कोणत्याही बफर देशाने अशी अमेरिका वादी भूमिका घेतल्यावर मोठी किंमत भोगावी लागते. पाकिस्तानने याचा अनुभव घेतला आहे. भारता भोवतलाच्या काही देशांनी अमेरिका, चीन, रशिया, जपान यांचे लष्करी तळ आपल्या देशात ठेवले तर भारत ते सहन करणार नाही. भारताचा व्यापार, सामरिक हालचाल अडवणारी भूमिका भारतीय उपखंडात एखाद्या देशाने घेतली तर आपण ती सहन करू शकणार नाही.

समतोल भूमिका युद्ध समाप्त करेल, ...अन्यथा

रशियाला अथक युद्ध लढण्याचा इतिहास आहे. पहिल्या, दुसऱ्या महायुद्धात रशिया दीर्घ मुदतीचे युद्ध लढला आहे. अफगानीस्तान मधील गोरिला युद्धाचे तंत्र आणि अनुभव रशियाला आहे. सिरीयात रशिया पाय रोवून उभा आहे. रशियन तेल, गॅस उद्योगातील मोठ्या कंपन्यांचे तारणहार पुतीन आहेत. अडथळा ठरणाऱ्या कोणत्याही युरोपियन देशाला किंमत चुकवण्याची तयारी पुतीन यांनी केली आहे. जागतिक निर्बंधांची तमा न बाळगता युक्रेनला संपूर्ण बेचिराख करून सर्वात जास्त निर्वासित युरोपच्या भूमीत पाठवण्यासाठी हे युद्ध खेळले जात आहे. युरोपियन युनियनाचा प्रचंड पैसा निर्वासित संख्येवर खर्च होणार आहे. पोलंड, हंगेरी, रोमानिया, ग्रीस, बल्गेरिया, नॉर्वे, फिनलंड, डेन्मार्क ईई युरोपियन राष्ट्रे जास्त काळ युक्रेनियन निर्वासितांना सांभाळू शकणार नाहीत. इंग्लडला निर्वासित नको आहेत.

सीरिया, अफगानीस्थान मधील निर्वासितामुळे जर्मनी, फ्रांस आदी राष्ट्रातील जनमत संतप्त आहे. युक्रेनच्या 30 लाख निर्वासिताचे पुनर्वसन करायला युरोपियन आणि नाटो देश समर्थ असणार नाहीत. या युद्धाचे भयानक परिणाम आहेत. युरोपने असे युद्ध 1945 नंतर प्रथम पाहिले आहे. पुतीन यांचा साहसवाद असा असेल याची जागतिक पातळीवरील सामरिक तज्ञांना कल्पना नव्हती. अँजेला मर्केल जर्मनीतून पायउतार झाल्यावर रशियाला समजाऊ शकेल असे नेतृत्व युरोप मध्ये नाही. त्यामुळे युक्रेन युद्धाची अखेर कशी असेल हे सांगता येत नाही. या युद्धामुळे नैसर्गिक वायू, तेल ई संसाधनांच्या वाटमारी मूळे जगात कोठेही भीषण युद्ध होऊ शकते हे अधोरेखित झाले आहे.

- क्रांतिकुमार कडुलकर, मुक्त पत्रकार
 सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अभ्यासक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा