Breaking

केंद्र सरकारच्या निषेधार्थ दि. २८, २९ मार्चला कामगार संघटनांचा देशव्यापी संप - डॉ. कराड


सातपूर : केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरी व राष्ट्रविरोधी धोरणाच्या निषेधार्थ दि. २८ व दि. २९ मार्च रोजी नाशिक जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने दोन दिवसांचा देशव्यापी संप करण्यात येणार असल्याची माहिती सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.


डॉ. कराड यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ  दि. २८ रोजी कामगार तालुकास्तरावर मोर्चे निदर्शने, आंदोलन करणार आहेत. तसेच दि. २९ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता गोल्फ क्लब मैदानावर जमून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.


या संपात सिटू, आयटक, इंटक, एच.एम.एस, बी.के.एस, एनटीयुआय, आयसीसीटीयु, टीयुसीआय, टीडीएफ, एआयबीइए, एआयआयइए, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, केंद्र सरकारी कर्मचारी संघटना, सेंट्रल पब्लिक सेक्टर ट्रेड युनियन्स आदी संघटना सहभागी होणार आहेत.


यावेळी आयटकचे राजू देसले, भारतीय कामगार सेनेचे उत्तम खांडबहाले, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे डॉ. भगवान पाटील, अरुण आहेर, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या सेक्रेटरी सुनंदा जरांडे, वीज कर्मचारी संघटनेचे व्ही.डी. धनवटे, विमा कर्मचारी संघटनेचे मोहन देशपांडे, सिएट टायर युनियनचे अध्यक्ष भिवाजी भावले, सतीश खैरनार, विवेक ढगे, अमोल बोरनारे आदी उपस्थित होते. त्यावेळी या संपात सहभागी होण्याचे आवाहन संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा