Breaking

महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, ४ श्रमसंहितेच्या विरोधात ५० हजार कामगार रखरखत्या उन्हात रस्त्यावर !


विडी व यंत्रमाग कामगारांना विस्थापित होऊ देणार नाही - आडम मास्तरांचा एल्गार !


सोलापूर : केंद्र सरकार जनता विरोधी प्रतिगामी धोरणांची अंमलबजावणी करत आहे. याचा थेट फटका या देशातल्या सर्वहारा वर्गाला बसत आहे. एकीकडे कोरोना महामारीने सर्वसामान्य माणसाचे जीवन उध्वस्त केले आहे. त्यात वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, पेट्रोल, डीझेल, घरगुती गॅस भरमसाठ दरवाढ झालेली आहे. वास्तविक लोकांना रोजगार मिळत नाही. महागाईच्या वाढीव दरानुसार पगार मिळत नाही. यामध्ये केंद्र सरकारने २९ कामगार कायद्यांचे ४ श्रमसंहितामध्ये रुपांतर करून त्याची धार बोथट केली आहे. यामुळे कामगारांना त्यांच्या अधिकारापासून वंचित रहावे लागणार आहे. सरकारी नोकऱ्यामध्ये २ कोटीपेक्षा जास्त जागा शिल्लक असूनही त्याची भरती केली जात नाही. असंघटीत उद्योगधंद्यात कामगार श्रम संहितामुळे शास्वत रोजगारांच्या संधी कमी झाल्या आहेत. किमान वेतनाची अंमलबजावणी जाणीवपूर्वक टाळली जात आहे. कामाच्या तासात वाढ होऊन त्यांना मिळणाऱ्या सामाजिक सुरक्षांमध्ये घट होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत सरकारने मनरेगाच्या अर्थ संकल्पीय तरतुदीत कपात केली आहे.

सार्वजनिक आरोग्य व शिक्षण याला तिलांजली दिली जात आहे. तर सर्वसामान्य जनतेच्या अन्न अधिकारावरही घाला घातला गेला आहे. या एकूण परिस्थितीत सार्वजनिक उद्योगधंद्याचे खाजगीकरण, खाजगी भांडवलदारांना अमाप सवलती व सर्वसामान्य जनतेच्या अधिकारावर आलेले गंडांतर यामुळे क्रयशक्ती कमी झाली आहे. परिणामी दारिद्र्य रेषेखालील जनसंख्येत मोठी वाढ झाली आहे. याच्या विरुद्ध जनतेत असंतोष असून देशातला विडी उद्योग सुद्धा पूर्णतः संपण्याच्या मार्गावर आहे. एका विडी उत्पादनावर एक रुपया जिजीया कर लावून कामगारांना फस्त करण्याचा डाव आहे. तसेच यंत्रमाग कामगारांना किमान वेतन व सामाजिक सुरक्षेचा लाभ देण्याचे शासनाचे आदेश असताना सुद्धा त्याच अंमलबजावणी होत नाही. अशा या विडी व यंत्रमाग कामगारांना कदापीही विस्थापित होऊ देणार नाही असा एल्गार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी पुकारला. सोमवार दि. २८ मार्च २०२२ रोजी केंद्रीय कामगार संघटना कृती समिती व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्या वतीने २८-२९ मार्च २०२२ या दोन दिवशीय देशव्यापी संपाची हाक देण्यात आली असून या अनुषंगाने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) व सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात १ लाख कामगार संपावर गेले असून प्रत्यक्ष रखरखत्या उन्हात सुद्धा ५० हजार कामगार सहभागी होऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केले. 

यावेळी सभेला संबोधित करताना आडम मास्तर पुढे म्हणाले कि, ३ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.गुलाबराव पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कॉ. गोदुताई परुळेकर नगर येथे पिण्याच्या पाण्याचे पाईप लाईन व रस्त्याचे उद्घाटन समारंभ होणार असून त्या ठिकाणी पाणी व रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. हा कामगारांनी केलेल्या संघर्षाचा विजय आहे. अशी लढाई या पुढेही आक्रमकतेने लढणार असल्याचा निर्धार करण्यात आला. 

या धरणे आंदोलनात सिटूचे राज्य महासचिव कॉ.एम.एच.शेख यांनी भूमिका मांडताना म्हणाले कि, रे नगरला मुलभूत सोयी सुविधासाठी अनुदान मिळावे. विडी उद्योगाला जीएसटी मध्ये सवलत द्यावी. विडी उद्योगास पूर्वीप्रमाणे कल्याणकारी सेस लावावा. विडी कामगारांसाठी काटेकोर किमान वेतनाची अंमलबजावणी करावी. चार श्रम संहिता रद्द करा व कामगार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा. महागाईवर आळा घाला. पेट्रोल, डीझेल, स्वयपाकाचा गॅसचे दरवाढ कमी करा. सार्वजनिक उद्योगधंद्याचे खाजगीकरण रद्द करा आणि राष्ट्रीय मुद्राकरण पाईपलाईन मागे घ्या. सार्वजनिक वितरण प्रणाली मजबूत करा. मागेल त्याला रेशन दुकानातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करा व योजना कर्मचाऱ्यांना वेतन द्या. सर्वाना मोफत शिक्षण द्या व नवीन शैक्षणिक धोरण मागे घ्या. सरकारी व खाजगी क्षेत्रात शाश्वत नोकऱ्यात युवकांना सामावून घ्या. तसेच बेरोजगार तरुणांना दरमहा रुपये ५००० बेकारभत्ता द्या. आयकर लागू नसलेल्या कुटुंबियांना किमान सहा महिने रु. ७५०० निर्वाह अनुदान द्या. शेतकऱ्यांना हमी भाव व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा. मनरेगामध्ये किमान २०० दिवस काम द्या. दररोज ६०० रुपये मजुरी द्या. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्यात कडक नियम बनवा. आदि प्रमुख मागण्यांवर सरकारला कोंडीत पकडले. 

या प्रसंगी कॉ. नलिनीताई कलबुर्गी, युसुफ शेख (मेजर), नसीमा शेख, नगरसेविका कामिनिताई आडम आदींनी सरकारवर जोरदार टीका केली. या प्रसंगी व्यासपीठावर व्यंकटेश कोंगारी, फातिमा बेग, सुनंदा बल्ला, रंगप्पा मरेड्डी, शंकर म्हेत्रे, मुरलीधर सुंचू, म.हनीफ सातखेड, अनिल वासम आदि उपस्थित होते. या धरणे आंदोलनाचे सूत्रसंचालन अनिल वासम यांनी केले.

सदर धरणे आंदोलनात शेवंता देशमुख, शकुंतला पाणीभाते, लिंगव्वा सोलापुरे, सलीम मुल्ला, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, बापू साबळे, विक्रम कलबुर्गी, अप्पाशा चांगले, हसन शेख, दाउद शेख, नरेश दुगाणे, दीपक निकंबे, मोहन कोक्कुल, सनी शेट्टी, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ, अफसाना बेग, किशोर महेता, शहाबुद्दीन शेख, बाबू कोकणे, अकिल शेख, इलियास सिद्धिकी, बालाजी गुंडे, नागेश म्हेत्रे, अंबादास बिंगी, श्रीकांत कांबळे, अमित मंचले, दत्ता चव्हाण, श्रीनिवास तंगडगी, बालाजी तुम्मा, तिपन्ना पेद्दी, राहुल बुगले, अभिजित निकंबे, विजय हरसुरे, पांडुरंग म्हेत्रे, अंबाजी डोंतुल,  प्रवीण आडम, प्रकाश कुऱ्हाडकर, सनी आमटी, राम मरेड्डी, विजय मरेड्डी, मारेप्पा फंदीलोलू, बजरंग गायकवाड, नितीन कोळेकर, राजन काशिद, अमोल काशिद, गंगाराम निंबाळकर, अनिल घोडके आदींसह हजारोंच्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा