Breaking

जुन्नर : ग्रामपंचायत जळवंडी अंतर्गत खडकुंबे येथे रोजगार हमीच्या कामांना सुरुवात


जुन्नर किसान सभेचा पुढाकार आणि जळवंडी ग्रामपंचायतचे सहकार्य, यामुळे मजुरांना मिळाला हक्काचा रोजगार


जुन्नर : आज दिनांक २८ मार्च २०२२ रोजी ग्रामपंचायत जळवंडी अंतर्गत खडकुंबे गावातील अंजनीमाता येथील तलावातील गाळ काढण्याचे काम रोजगार हमी योजनेतून सुरु करण्यात आले. या कामावर पहिल्याच दिवशी ४३ मजुरांनी हजेरी लावली. 

जुन्नर तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीशी संबधीत विविध मागण्या घेऊन किसान सभा सातत्याने प्रशासनासोबत संवाद करत आहे. शेतात कामे नसल्याने आणि बागायती शेतीवर सध्या कोणत्याही प्रकारचा रोजगार नसल्यामुळे मजुरांवर घरीच बसण्याची वेळ येते आहे. गावातील युवक रोजगारासाठी चाकण भोसरी अशा औद्योगिक वसाहतींचा आसरा घेतात. परंतु गावातील महिला, युवती, शेतकरी, हंगामी मजुर यांना काम नसल्याने बेरोजगारीचे संकट त्यांच्यावर येते. अशा परिस्थितीमध्ये गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जळवंडी ग्रामपंचायत अंतर्गत खडकुंबे गावात पिण्याच्या पाण्याची समस्या उन्हाळा अखेरीस निर्माण होते. जनावरांना पिण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठीही पाण्याची समस्या निर्माण होत असते. यामुळे नागरिकांनी गावातील अंजनीमाता मंदिर परिसरातील तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा गाळ काढल्याने काही प्रमाणात पाणी साठविण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. यासाठी किसान सभेने केलेले मार्गदर्शन आणि ग्रामपंचायतचे सहकार्य यामुळे रोजगार आणि पाणी टंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तळ्यातील गाळ काढल्यावर तळ्याची खोली वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. पुढील दोन महिने गावातच काम उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी ग्रामस्थांनी किसान सभा आणि ग्रामपंचायतकडे केलेली आहे. यासाठी सेवाभावी संस्थांच्या मदतीने तळ्याच्या खोलीकरणासाठी मदत मिळविण्याचा प्रयत्न किसान सभा करेल तर ग्रामपंचायतकडे निधी असल्यास त्याचाही काही प्रमाणात या तळ्याच्या खोलीकरणासाठी वापर करण्याचे आश्वासन ग्रामसेवक यांनी यावेळी ग्रामस्थांना दिलेले आहे. 


गावामध्ये कामे चालु करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल ग्रामस्थांनी किसान सभाचे आभार मानले, तर प्रशासनाच्या वतीने जे सहकार्य मिळाले त्याबद्दल किसान सभा आणि ग्रामस्थ यांनी तहसीलदार रविंद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, मनरेगा ए.पी.ओ. दुर्गेश गायकवाड, तांत्रिक अधिकारी जितेंद्र भोर, ग्रामसेवक राठोड भाऊसाहेब यांचे आभार मानले.

यावेळी किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, ग्रामसेवक राठोड भाऊसाहेब, किसान सभा तालुका सदस्य नारायण वायाळ, कोडींभाऊ बांबळे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण बुधा सरोगदे, आशा सेविका यमुना बाळू करवंदे, ग्रामपंचायत सदस्या गीता वसंत करवंदे, सोमा वायाळ आदीसह मजूर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा