Breaking

कामगार विरोधी श्रम संहिता रद्द करा, वाढत्या महागाईला लगाम लावा - सिटू च्या कामगारांचा मोर्चा


जालना : कामगार विरोधी श्रम संहिता, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, देशाच्या सार्वजनिक संपत्तीचे खाजगीकरण या देशविघातक भांडवलदार धार्जिण्या कारभारास रोखण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी दि.२८ ,२९ मार्च २०२२ रोजी देशव्यापी कामगार संप पुकारण्यात आला. त्याचाच भाग म्हणून म्हणून दिनांक २८ मार्च रोजी अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयावर सिटू च्या वतीने मोर्चा काढण्यात आला.


या मोर्चाला संबोधित करताना सिटू चे राज्य सचिव कॉ.अण्णा सावंत म्हणाले की, मोदी सरकार हे उद्योगपती धार्जिणे असून देशातील कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहे.येथील अंगणवाडी, शालेय पोषण आहार, कामगार, आशा वर्कर्स व गटप्रवर्तक व इतर योजना कर्मचाऱ्यांना हद्दपार करण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करत आहे.अशी कडाडून  टीका केली,तसेच सिटू चे जिल्हाध्यक्ष मधुकर मोकळे, व जिल्हा सचिव गोविंद आर्द्ड यांनी ही बोलताना केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरले.


या मोर्चात कामगार विरोधी , मालक धार्जिण्या कामगार संहिता रद्द करा, वाढती महागाई तात्काळ थांबवा. देशाच्या सार्वजनिक संपत्तीचे खाजगीकरण बंद करा. अंगणवाडी आशा, गट प्रवर्तक शालेय आहार कामगार इत्यादी योजना कर्मचार्यांना सेवेत कायम करा . सामाजिक सुरक्षा द्या. आयकर लागू नसलेल्या कुटुंबाना स्वस्त धान्य आणि ७५०० रु रोख अनुदान द्या समान कामाला समान वेतन द्या, कंत्राटीकरणं बंद करा. शेती, शिक्षण, आरोग्य आणि अन्य समाज उपयोगी क्षेत्रावरील सार्वजनिक गुंतवणूक वाढवा. त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी अतिश्रीमंत वर्गावरील उत्पन्न व संपत्ती करांत वाढ करा बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांची कडक अमलबजावणी करा. ऊसतोड कामगारांची वतीने नोंदणी करून आरोग्य, विमा, सामाजिक सुरक्षा, मुलाच्या शिक्षणासाठी कल्याणकारी योजना लागू करा. रिक्षावाले, हातगाडीवाले, पेपर विक्रेते, शेतमजूर इत्यादी असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळे स्थापन करा. सर्व असंघटित कामगारांना घरकुल द्या, वयाच्या ५५ वर्षानंतर किमान ५००० रु पेन्शन लागू करा. सर्व शेतमालासाठी हमी भावाचा कायदा करा व पीक खरेदीची यंत्रणा उभारा,  शहरी भागात रोजगार हमी योजना लागू करा. मानरेंगासाठी जास्त निधीची तरतूद करा. किमान ६०० रु रोजच्या वर्षातून २०० दिवस रोजगाराची हमी द्या. इ.मागण्या करण्यात आल्या.

या मोर्चात अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कामगार, वैद्यकीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने सामील झाले होते. यावेळी सिटू चे राज्य सचिव अण्णा सावंत, जिल्हाध्यक्ष मधुकर मोकळे, जिल्हा सचिव गोविंद आर्द्ड, विश्वेश्वर स्वामी, सुभाष मोहिते, ऍड.अनिल मिसाळ, कल्पना आर्द्ड, प्रभाकर कुलकर्णी, गयाबाई वाघ, यादवराव दिघे, जनार्धन मूळे, हरिश्चंद्र लोखंडे, उमेश टोके, प्रशांत पळसकर, दीपक दवंडे, संजय कडाळे, बाबासाहेब पाटोळे, सुधीर डिक्कर, एकनाथ तरडे, अनिता दांडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार हजर होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा