Breaking

वनवणवा रोखण्यासाठी एलईडी वाहनाद्वारे गावोगावी जनजागृती


बारामती : जैवविविधतेचे रक्षण आणि वन वणव्यावर नियंत्रणाचा संदेश देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय पुणे मार्फत एलईडी वाहनाच्या माध्यमातून ‘वनवणवा नियंत्रण व जैवविविधता’ या संकल्पनेवर आधारीत गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे.


साधारणत: जानेवारी ते एप्रिल महिन्यात जास्त वणवे लागतात. यात बहुतांश वणवे हे मानवनिर्मित असतात. वणव्यामुळे निसर्ग आणि वन्य प्राण्याबरोबरच मानवी वस्तीलाही धोका निर्माण झाला आहे. वणव्यामुळे पर्यावरणाची हानी तर होत आहेच पण कार्बनडायऑक्साईड ही वातावरणात वाढतो आहे. वणव्याबाबत नागरिकांना माहिती देऊन वणवा नियंत्रणात त्यांचा सहभाग वाढवावा या दृष्टिने जिल्हा माहिती कार्यालयाने राबविलेल्या जनजागृतीच्या उपक्रमाला विविध ठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.


गेले दोन दिवस इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील वनक्षेत्रालगतच्या गावात या विषयाबाबत माहिती देण्यात आली. इंदापूर तालुक्यातील लासुर्णे, बारी, काझड, भरणेवाडी, लुमेवाडी, निंबगाव, शेलगाव, व्याहाळी पोंधवडी, बारामती तालुक्यातील हिंगणीवाडा, वासुंदे, खराडे वाडी, कारखेल, देऊळगाव रसाळ, नारोळी, सुपे, दंडवाडी, पानसरेवाडी, खडू खैरवाडी, मोरगाव, मुर्टी, मोढवे, माळवाडी, शिरस्णे, कठफळ, को-हाळे बु., व पणदरे, पुरंदर तालुक्यातील राख व जेजूरी इत्यादी ठिकाणी एलईडी वाहनाच्या मदतीने वनवणवा नियंत्रणाचे महत्व सांगण्यात आले.आज जेजुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यामंदीर येथे शालेय विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने माहितीपटाच्या माध्यमातून पर्यावरणविषयक महत्वाच्या पैलूंची माहिती घेतली. ‘वनवणवा नियंत्रण व जैवविविधता’ संदर्भात माहितीपट आणि दृश्यांच्या माध्यमातून चांगली माहिती मिळत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा