Breaking


ब्रेकिंग : औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू, राज ठाकरेंची सभा रद्द होणार?


औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार असून मनसेकडून त्याची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र प्रशासनाने अद्याप सभेला परवानगी दिली नसताना मनसे समोर आणखी एक आव्हान निर्माण झाले आहे.


पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी औरंगाबादमध्ये आजपासून ९ मे पर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केले आहे. सणवार तसंच विविध आंदोलनांची कारणं देत ही जमावबंदी लागू केली आहे. आदेशामध्ये मनसेने मशिदींवरील भोंगे काढण्यासंबंधी दिलेल्या इशाऱ्याचाही उल्लेख आहे. सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तीएकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश लागू केले आहेत. त्यामुळे १ मे रोजीच्या राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर राज यांची सभा घेण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत. या सभेसाठी एका लाखांहून अधिक लोक जमतील अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता पोलिसांनी पुढील १३ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे राज ठाकरेंची नियोजित सभा होणार काही नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


दरम्यान, मनसेकडून राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये राज ठाकरे आपण धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचं सांगत आहेत. या सोबतच टीझरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच केला असून चलो संभाजीनगर अशी घोषणा दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा