Breaking

उपेक्षितांच्या कल्याणासाठी तरुणांनी संस्थात्मक कामात मन आणि वेळ द्यावा - अभिजित तांबे


पिंपरी चिंचवड : वुई टू गेदर फाउंडेशन, पिंपरी चिंचवड येथील स्वयंसेवी संस्थेने विरंगुळा केंद्र, महात्मा फुले नगर चिंचवड येथे रचनात्मक, सेवाभावी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्टडी सर्कल अर्थात विचार मंथन शिबिर आयोजित केले होते.


या कार्यक्रमाचे अध्यक्षा प्रा.वैशाली गायकवाड होत्या, शिबिराचे उदघाटन यशवंत कण्हेरे यांनी केले. संस्थेचे संस्थापक क्रांतिकुमार कडुलकर यांनी मागील तीन वर्षांच्या कामाची माहिती देताना सर्व वक्ते आणि उपस्थितांचे स्वागत केले.


प्रमुख मार्गदर्शक अभिजित तांबे, संस्थापक अभिसार फाउंडेशन वाकड म्हणाले की, समाजात विविध प्रकारची न संपणारी दुःखे आपण पहात असतो. आर्थिक दुर्बल, गरीब व्याधी ग्रस्त, निराधार, दिव्यांग नागरिक, मुले मुली, महिला यांचे खडतर जीवन सक्षम करण्यासाठी तरुण ध्येयवादी तरुणांनी संस्थात्मक कामात वेळ आणि मन अर्पण करावे. ऑटिझमग्रस्त म्हणजे स्वमग्न मनोविकाराने बाधित असलेल्या मुलांचे संगोपन आणि शाळा चालवणारे अभिजित तांबे विचार मंथन आणि कार्यकर्ता अभ्यास प्रेरणा शिबिरामध्ये बोलताना ते म्हणाले की, दिन दुबळ्या उपेक्षित समाजासाठी आयुष्य वेचणारे गाडगेबाबा आणि आणि त्यांच्या विचारानुसार संस्था चालवणारे बाबा आमटे, बाबा आढाव यांनी कल्याणकारी संस्था स्थापन केल्या. त्यांनी त्यांचे तन, मन, धन अर्पण केले. आज सर्वत्र करिअरवादी वैयक्तिक समृद्धीचा आर्थिक प्रभाव समाजात आहे. त्याचवेळी उपेक्षित समाजासाठी संस्थात्मक कामामध्ये झोकून देणारे समर्पित तरुणांनी संस्थात्मक कामासाठी वेळ द्यावा, असे आवाहन  त्यांनी केले.


समस्याग्रस्त वंचित, अनाथ बालकांचे मायबाप बना -माऊली हारकळ


तळवडे येथील विकास अनाथ बालक आश्रमाचे संस्थापक, संचालक माऊली हारकळ आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, संपूर्ण अनाथ, निराश्रित, एडस-ग्रस्त व्यक्तिंची मुले, ज्यांचे पालक तुरुंगात आहेत अशी मुले, बाल-मजूर, बाल-गुन्हेगार, फुटपाथ, रेल्वे स्टेशनात राहणारी मुले, मानसिक रुग्ण, अपंग, दारिद्र्य-पीडीत, भिकारी मुले इत्यादींना कायद्याने अनाथ असे म्हणतात. त्यांची 18 वर्षे पूर्ण झाली की त्यांना आश्रमात ठेवता येत नाही. या मुलांचे संगोपन आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत बकरावी लागते, सर्व काम सरकारने करण्यापेक्षा सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी अनाथ बालकांचे मायबाप व्हावे. तळवडे येथे 50 अनाथ मुलामुलींचा संगोपन ते गेली दहा वर्षे करत आहेत. त्या मुलांमुलींच्या पूर्ण शिक्षण देऊन सक्षमीकरण करतात. मुलींचे विवाह करतात. नुकताच एका मुलीचे लग्न आणि पहिले बाळंतपण त्यांनी स्वखर्चाने केले. त्यांची कीर्तनकार पत्नी स्मिता हारकळ त्यांना साथ देतात.


ते पुढे म्हणाले की, एका वाईट परिस्थितीत असताना मला एका ओळखीच्या कुटुंबाने वाढवले, माझे पालन पोषण केले. अशी परिस्थिती असलेल्या मुलांमुलींचा मी आश्रम चालवत आहे. तुम्ही मनापासून मानवतावादी कार्य सुरू केले तर परमेश्वर मदतीसाठी शेकडो देवदूत दारात पाठवतो. तरुण कार्यकर्त्यांनी अनाथ बालकांचे मायबाप व्हावे.


निःस्वार्थ सेवेसाठी दानशूर लोकांना एकत्र केले पाहिजे - प्रा.दिपक जाधव


कोरोना महामारीने गरीबापासून ते मध्यमवर्गापर्यंत सर्वांना संकट काळ निर्माण केला. आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून किराणा, भोजन नाष्टा वाटत होतो. कडक संचार बंदीच्या काळात बंद पडलेल्या चुली पेटवत होतो. त्याच काळात हजारो हात मदतीसाठी पुढे आले. या दानशूर लोकांमुळे उपेक्षित वर्गाचे सक्षमीकरण करता येईल, असे मनोगत प्रा.दिपक जाधव, संचालक, देवदर्शन युवा मंच, चिंचवड या संस्थेचे संचालक यांनी वुईटूगेदर  फौंडेशनच्या कार्यकर्ता अभ्यास प्रशिक्षण प्रेरणा शिबिरात व्यक्त केले.


कोरोनामूळे अनेक घरामध्ये कर्ते मृत्युमुखी पडले. महाराष्ट्रात 20 हजार महिला विधवा झाल्या. मध्यमवर्ग आणि गरीब यांची अवस्था एकाच स्तरावर आली होती. फक्त किराणा किट वाटून ही समस्या सुटणारी नव्हती. त्या तरुण विधवा महिलांच्या कौशल्य विकासासाठी आम्ही मोफत संगणक प्रशिक्षण बवर्ग सुरू केले. रिटेल, शोरूम, टेलिकॉल युनिट्स ई कामासाठी सॉफ्ट स्किल त्यांना शिकवले. मार्केटच्या मागणीनुसार किमान कौशल्य मिळवलेल्या महिला मुलींना किमान उत्पन्नाच्या   रोजगाराची हमी देण्याचे काम केले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.वैशाली गायकवाड यांनी सांगितले की, प्रत्येक पिडीत आणि उपेक्षित महिलेला शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रशिक्षण केंद्र पिंपरी येथे सुरू केले आहे. किमान दहावी, बारावी उत्तीर्ण गरजू महिला मुलींना वाणिज्य, बँकिंग, रिसेप्शन, रिटेल, शोरूम इ क्षेत्रात काम मिळू शकते. त्यासाठी आवश्यक सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कोर्स आम्ही तयार केले आहेत. मोफत प्रशिक्षण घेण्यासाठी महिलांनी पुढे यावे.


सामाजिक कामाचे कंत्राटी करण करता येत नाही, या कामाचे वेड लागले पाहिजे - यशवंत कण्हेरे


सामाजिक कामामध्ये आवड असावी लागते. एखाद्या वंचित, उपेक्षित व्यक्तीला सक्षम करण्यासाठी आयुष्य वेचावे लागते. आपल्या संत महात्म्यांनी करुणेचा सागर होण्यास सांगितले. उपेक्षित, अशिक्षित, अंधश्रद्धा ग्रस्त लोकांमध्ये विवेक जगावण्याचे कार्य गाडगे महाराजांनी केले. आज हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छता करणारी तरुण पिढी दिसत नाही. सामाजिक कामाचे वेड लागले पाहिजे. सर्व काही आउट सोअरसिंग करून जीवन संपन्न होणार नाही, असे या शिबिराचे उदघाटन मनोगत स्वच्छता दूत आणि जेष्ठ नागरिक यशवंत कण्हेरे, अध्यक्ष, कर्मयोगी संत गाडगे महाराज जागृती मंच, महात्मा फुले नगर यांनी केले. वुई टू गेदरच्या अभ्यास शिबिरात व्यक्त केले.


या शिबिराचे प्रास्ताविक सलीम सय्यद, सूत्रसंचालन सोनाली मन्हास यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन शेहेनाज शेख, दिलीप पेटकर, सोनाली डावरे, जलील शेख, सोनाली शिंदे, गौरी साकुरे, शिवानंद चौगुले, एम के शेख, किशोर कुमावत, शैलजा कडुलकर यांनी केले. आभार प्रदर्शन मेघना भोसले यांनी केले. मावळ, भोसरी, मोशी, चिंचवड, आकुर्डी, प्राधिकरण, चिखली, पुणे शहर, तळवडे, जुन्नर येथील 60 सदस्य उपस्थित होते.


- क्रांतिकुमार कडुलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा