Breaking


ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात कल्याणाची गुढी


लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे रविवारी उद्घाटन


मुंबई / राहुल खरात : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 03 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात येणार आहे. राज्यातील ऊसतोड कामगारांना दिलेल्या शब्दाचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला असून या कामगारांच्या कल्याणाची नवी गुढी राज्य सरकारच्या माध्यमातून उभारत आहोत, हा माझ्यासाठी ऐतिहासिक दिवस असल्याची भावना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

पुणे येथील येरवडा परिसरातील सामाजिक न्याय भवनाच्या आवारात हे कार्यालय साकारले असून, या महामंडळाला धनंजय मुंडे यांनी मूर्त स्वरूप दिले आहे.

रविवारी दि. 03 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता लोकार्पणाचा हा सोहळा सामाजिक न्याय भवन, येरवडा पुणे येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार असून या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांसह ऊसतोड कामगार व वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.

ऊसतोड कामगारांची नोंदणी केलेल्या कामगारांना यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र दिले जाणार आहेत.


अगदी लहानपणापासून ऊसतोड कामगारांचा संघर्ष, त्यांची पिढ्यानपिढ्या होत असलेली हेळसांड पाहत असताना, मनाला वेदना होत. समाजकारणात सक्रिय झाल्यापासून या प्रवर्गासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काहीतरी विधायक करण्याचा माझा मानस राहिलेला आहे. यादृष्टीने सातत्याने पाठपुरावा करत आहे.

आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला मूर्त स्वरूप येत आहे. पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून ऊसतोड कामगारांच्या कल्याणाची नवी गुढी राज्य सरकारच्या माध्यमातून उभारत आहोत, याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. हा माझ्यासाठी ऐतिहासिक दिवस असल्याची भावना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे व या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा