Breaking

सुप्रसिद्ध पटकथा लेखिका शमा जैदी यांना 'जीवनगौरव पुरस्कार' आयसीए तर्फे घोषित


मुंबई : 'इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हल' (ICA) या महोत्सवाच्या पुरस्कार वितरणाचा सोहळा यावर्षी ३ एप्रिल रोजी ऑनलाइन होणार आहे. सुप्रसिद्ध पटकथा लेखिका शमा जैदी यांना या महोत्सवामध्ये जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पटकथा लेखिका शमा जैदी यांना जीवनगौरव पुरस्कार शमा झैदी ( जन्म २५ सप्टेंबर १९३८, वय ८३ वर्षे ) पटकथा लेखक, वेशभूषाकार, कला दिग्दर्शक, कला समीक्षक आणि माहितीपट निर्मात्या आहेत. त्यांनी सत्यजित रे, श्याम बेनेगल, एम. एस. सथ्यू अशा दिग्गज सिने दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. त्याशिवाय त्यांनी कास्ट्यूम डिझायनर आणि आर्ट डायरेक्टर म्हणूनही काम केले आहे.


पटकथा लेखक म्हणून त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहेत. चरणदास चोर, गरम हवा, शतरंज के खिलाडी, कन्नेश्वर रामा, भूमिका, उमराव जान, चक्र, आरोहण, मंडी, सुसमन, त्रिकाल, अंतरनाद, सूरज का सातवां घोडा, मम्मो, सरदारी बेगम, झुबेदा, सरदारी बेगम. याशिवाय त्यांनी मंथन आणि निशांत या हिंदी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून योगदान दिले आहे. 


सामाजिक संदेश देणारा उद्देशपूर्ण सिनेमा ज्यांनी घडविला आणि जे आज सिनेरसिकांच्या विस्मृतीत गेले आहेत, अशा प्रतिभावान सिनेकलाकाराला 'आयसीए' फिल्म फेस्टिव्हलमध्ये जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. स्मृतिचिन्ह, शाल व अकरा हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१९ सालच्या महोत्सवात हा पुरस्कार सागर सरहदी यांना पुण्यात प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर मागच्या वर्षी झालेल्या महोत्सवात हा पुरस्कार चित्रपट दिग्दर्शक सईद मिर्जा यांना प्रदान करण्यात आला होता. या वर्षी हा पुरस्कार पटकथा लेखिका शमा जैदी यांना प्रदान करण्यात येणार आहे 

या महोत्सवाच्या उद्दिष्टांबद्दल संचालक अमनदीप सिंग असे म्हणाले की, "आयसीए फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून आम्ही सार्थक आणि सर्जनशील सिनेमा संस्कृती लोकांपर्यंत नेऊ इच्छितो. सामाजिक जाणिवांशी जोडलेला जनसिनेमा तयार करण्याच्या प्रेरणा नव्या सिनेकलाकारांमध्ये अधिकाधिक रुजवाव्यात हा आमचा उद्देश आहे. या माध्यमातून आपण मानवी मूल्ये टिकवून ठेवणारे लोकशाही जाणिवांचे कलाकार घडवू शकू, असा आम्हाला विश्वास आहे. महान अभिनेता दिग्दर्शक चार्ली चॅपलिन यांच्या जन्मदिनी १६ एप्रिलला महोत्सवाची नोंदणी सुरू होते. जगभरातून आलेल्या लघुपटांमधून ज्यूरी निवड करतात. यावर्षी निवड समितीत ज्यूरी म्हणून डॉ. मोहन दास, गुरुदत्त सोनसुरकर, राजीव शंकर गोहिल, उषा देशपांडे, रितेश ताकसांडे या सिनेमा क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींनी काम पाहिले." 


या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी हा महोत्सव पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या वर्षी ४५ देशांमधून २५० चित्रपट या महोत्सवात आले आहेत. यामधून निवडण्यात आलेल्या उत्कृष्ठ चित्रपटांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. हा पुरस्कार सोहोळा रविवार ३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता महोत्सवाच्या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यात विजेत्या चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, तंत्रज्ञ व अन्य कलावंतांना गौरविण्यात येणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक अमनदीप सिंग यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा