Breaking

जुन्नर : निमगिरी येथे शाळा पूर्वतयारी अभियान संपन्न


जुन्नर
 :  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे, पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जुन्नर, शिक्षण विभागाच्या माध्यमातून केंद्रस्तरीय शाळा पूर्वतयारी अभियान आणि शिक्षक प्रशिक्षण अभियान जिल्हा परिषद केंद्रशाळा, निमगिरी येथे आयोजित करण्यात आले.

यावेळी केंद्र प्रमुख संजय जाधव म्हणाले, "कोरोना महामारीमुळे साधारणपणे दोन वर्षांपासून मुले शिक्षण प्रवाहापासून वंचित आहेत. सुरवातीला इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांचा सर्व्हे करून दाखलपात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करून २८ मार्चपासून शाळा पूर्वतयारी अभियान प्रत्येक शाळेत अंगणवाडी शिक्षिका व शिक्षकांच्या सहकार्याने हे अभियान चालू करायचे आहे. 


प्रत्येक विद्यार्थ्यांचे विकासपत्र तयार करून त्यामध्ये त्याची प्रगती, तसेच आवश्यक मार्गदर्शन नोंद करण्याची गरज असणार आहे. त्यामुळे तो विद्यार्थी इयत्ता पहिलीत दाखल होण्यासाठी तयार होईल. तो मानसिक, भावनिक आणि सामाजिक दृष्ट्या तयार होईल. शाळा पूर्वतयारीसाठी हे प्रशिक्षण निमगिरी केंद्रातील सर्व शिक्षक व शिक्षिकांना अत्यंत लाभदायी ठरेल असेही जाधव म्हणाले.या प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक जिल्हा परिषद शाळा खैरे च्या अलका भालेकर आणि जिल्हा परिषद शाळा खटकाळे घ्या ज्योती थोरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरीभाऊ साबळे, शिक्षक समिती जुन्नर अध्यक्ष बाळासाहेब लांघी, मुख्याध्यापक सोमा केदारी, कु-हाडे मॅडम यांनी उद्घाटन केले. 

केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, माता पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बाळासाहेब लांघी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन त्रिंबक बगाड आणि निलेश ढमाले यांनी तर आभारप्रदर्शन गुणवंत केदारी यांनी केले. मुख्याध्यापक सोमा केदारी, विठ्ठल मुंढे, खेवजी मोरे आणि केंद्रशाळेतील सर्व शिक्षकांनी प्रशिक्षण कार्यक्रम व्यवस्था केली होती.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा