Breaking

भारनियमन लादून महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रावर 'काळरात्र' आणली - महेश लांडगे- महाविकास आघाडी सरकारने लादलेल्या भारनियमनाच्या विरोधात भाजपचा कंदील मोर्चा

- भारनियमनाच्या तडाख्यात नागरिक उद्योजक वैतागले

- औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये सात आठ तास वीज गायब; कारखानदारी चालणार कशी


पिंपरी : महाराष्ट्रात लोडशेडींग अर्थात भारनियमन लावल्याच्या निषेधार्थ पिंपरी, मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालय येथे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार (दि.24) सायंकाळी महावितरणच्या विरोधात कंदील मोर्चा काढण्यात आला. राज्यभरात भारनियमनाच्या तडाख्यात नागरिक तावून-सुलाखून निघत आहेत. उद्योजकांचे तर अक्षरश: या भारनियमनामुळे कंबरडे मोडले आहे. याला सर्वस्वी महाआघाडी सरकार जबाबदार असल्याची घणाघाती टीका भाजप शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी केली.


महेश लांडगे यावेळी म्हणाले, सातत्याने गेल्या दोन वर्षापासून अघोषित भारनियमनाचा त्रास सुरूच आहे. मात्र या उन्हाळ्याच्या तडाख्यात भारनियमन अधिकच गडद झाले आहे. कोणतीही सूचना न देता वीज आठ ते दहा तास औद्योगिक पट्ट्यामध्ये गायब असते. अशावेळी उद्योजकांनी करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे उद्योजकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर उद्योजक आधीच खचलेले असताना त्यात आता  लोडशेडिंगचे दुखणे त्यांच्यामागे सुरू झाले आहे. यातून उभारी कशी घ्यावी असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. शिवाय नागरिकांना देखील याची मोठ्या प्रमाणात झळ बसत आहे. मुलांच्या परीक्षा सुरू आहेत अशा काळात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रहिवासी पट्ट्यातील वीज गायब असते. मुलांनी परीक्षा कशा द्याव्या. अभ्यास कधी करावा. पुरेशी झोप कशी घ्यावी असा देखील प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. एक प्रकारे विद्यार्थ्यांचे नुकसान, व्यापाऱ्यांचे नुकसान करून महाविकास आघाडी सरकार देशाचे भविष्य आणि वर्तमान दोन्ही खराब करत आहेत.


माजी पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले,  भारनियमन लादून राज्यातील जनतेला भर उन्हाळ्यात काळोखात लोटलेले आहे. एकीकडे भरमसाट बिले वसुल करायची आणि दुसरीकडे भारनियमनाची टांगती तलवार कायम नागरिकांच्या डोक्यावर ठेवायची असा कारभार महाविकास आघाडी सरकारचा सुरू आहे. याला केवळ महावितरण जबाबदार नसून महाविकास आघाडी सरकारचा अनागोंदी कारभार देखील कारणीभूत आहे. महावितरण कंपनीच्या लोडशेडिंग, पठाणी बील आणि वीज बिल वसुलीच्या आणि अन्यायकारक वीज तोडणी याच्या विरोधात म्हणूनच "कंदील आंदोलन" करत भाजप रस्त्यावर उतरले आहे असे देखील ढाके यावेळी म्हणाले.


कारखानदारी चालणार कशी


पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्टा आहे. तब्बल पंचवीस हजार छोटे-मोठे उद्योग व्यवसाय या भागांमध्ये आहेत. या भागांमध्ये अघोषित भारनियमनाचा त्रास यापूर्वीदेखील सुरू होतात. शिवाय आता सरकारने भारनियमन लादून दुहेरी संकट उद्योजक ,व्यापारी यांच्यावर लादले आहे. गेली दोन वर्ष महामारी, लॉकडाऊन अशा सर्व संकटांमध्ये गेली आहेत. आता कुठे उद्योग, व्यवसाय उभारी घेत असताना पुन्हा भारनियमनाचे संकट ओढवले. यातून आता कारखानदारीत चालणार कशी असा मुख्य प्रश्न निर्माण झाला आहे. याचा दूरगामी परिणाम येथील नागरिकांवर देखील होणार आहे असे मुद्दे देखील या कंदील मोर्चात उपस्थित करण्यात आले. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय... उषःकाल होता होता, काळ रात्र आली.. ही काळरात्र महाआघाडी सरकारने आणली... अशा घोषणा देत पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे पिंपरी येथे कंदील मोर्चा काढण्यात आला. 


यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, संघटन सरचिटणिस अमोल थोरात, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, अर्जुन ठाकरे, अनुराधा गोरखे,  तसेच अजय पाताडे, सुप्रिया चांदगुडे, वैशाली खाडये, रवी जांभुळकर, दिनेश यादव, अशा काळे, विणा सोनवलकर, सुभाष सरोदे, सतपाल गोयल, विजय शिनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा