Breaking


राज्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी राज्य सरकारने कायदेशीर उपाय केले पाहिजेत - सर्वपक्षीय बैठकीत माकपची मागणी


मुंबई : ३ मे रोजी येत असलेल्या रमजान ईद पर्यंत मशिदींवरील लाऊडस्पीकर उतरवावेत, अन्यथा त्या दिवशी मनसे (MNS) या पक्षाच्या वतीने राज्यातील मशिदींसमोर हनुमान चालिसाचे लाऊड स्पीकरवरून वाचन करू अशी धमकी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिली आहे.


या पार्श्वभूमीवर राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू नये, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy chief minister Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री शासकीय अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक सोमवार दि. २५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत सहभागी होत असताना माकपचे (CPIM) राज्य सचिव डॉ. उदय नारकर (Dr Uday Narkar) यांनी राज्यात निर्माण होत असलेल्या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधले आणि राज्य शासनाने घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत केले. राज ठाकरे यांनी दिलेल्या या चिथावणीमुळे राज्यात सामाजिक सलोखा बिघडून अशांतता माजण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्य सरकारने सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व ते कायदेशीर उपाय केले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, लाऊडस्पीकरच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयाने वारंवार दिलेल्या निर्देशाचे सर्वच घटक पालन करतील, याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे, अशीही मागणी डॉ. नारकर यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home minister Dilip Walse Patil) यांच्यासह मंत्रिमंडळातील अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे राज्यातील प्रमुख आणि आमदार उपस्थित होते. या बैठकीस भाजपचे कुणीच उपस्थित राहिले नाहीत, याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात आले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा