Breaking


DYFI च्या बेरोजगारी विरोधातील आंदोलनात युवकांनी सहभागी व्हावे - गणेश दराडे


गोरख आगीवले यांची जिल्हा सचिवपदी निवड ! 

 
अकोले : मोदी सरकारच्या कॉर्पोरेट धार्जिण्या व श्रमिक विरोधी धोरणांचा  परिणाम म्हणून देशात व राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुठभर धनिकांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढत असताना देशातील 55 टक्के जनता अक्षरशः दारिद्र्यात ढकलली जात आहे. कोविड काळात आरोग्य सुविधा न मिळाल्याने लाखो नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. देशवासीयांच्या मनात यामुळे मोठा असंतोष खदखदतो आहे. श्रमिक व युवकांच्या मनातील हा असंतोष सरकारच्या विरोधात उफाळून येऊ नये यासाठी केंद्रातील मोदी सरकार, भाजप व आर. एस. एस. जनतेत धर्मांधतेचे विष पेरत आहे, असा गंभीर आरोप डीवायएफआय चे राज्य उपाध्यक्ष गणेश दराडे यांनी केले.

डीवायएफआय चे अहमदनगर जिल्हा अधिवेशन अकोले येथे संपन्न झाले. यावेळी ते उद्घाटनपर भाषणात बोलत होते.


पुढे बोलताना दराडे म्हणाले, "डीवायएफआय ही देशातील सर्वात मोठी युवकांची संघटना सरकार, भाजप व आर. एस. एस. चा हा कावा ओळखून आहे. देशभरातील युवक व युवतींना संघर्षात उतरून धर्मांधतेच्या विषाचा मुकाबला करत डीवायएफआय  जनतेचे शिक्षण, रोजगार, आरोग्य, अन्न व निवारा यासारखे प्रश्न ऐरणीवर आणत आहे. युवक व युवतींनी  डी. वाय. एफ. आय. च्या या प्रयत्नात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

अधिवेशनात अकोले, संगमनेर व राहुरी तालुक्यातून मोठया संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते. एकनाथ मेंगाळ यांनी यावेळी मागील तीन वर्षांचा अहवाल मांडला. देशातील व राज्यातील युवकांच्या समोर असलेल्या विविध समस्या व आगामी काळात डीवायएफआय घेणार आलेल्या प्रश्नांची मांडणी एकनाथ मेंगाळ यांनी केली. 


किसान सभेचे डॉ.अजित नवले, सिटू कामगार संघटनेचे सदाशिव साबळे, नामदेव भांगरे यांनी अधिवेशनास शुभ संदेश दिला. 

अधिवेशनात नऊ जणांची नूतन कार्यकारणी यावेळी निवडण्यात आली. एकनाथ मेंगाळ यांची जिल्हा अध्यक्षपदी व गोरख आगीवले यांची जिल्हा सचिव म्हणून निवड करण्यात आली. गणपत मधे उपाध्यक्ष, सुरेश गिर्हे सह सचिव, कोषाध्यक्ष देवराम डोके, सदस्य म्हणून वामन मधे, भरत वळे, नाथा बहुरले, ज्ञानेश्वर वाजे यांची निवड करण्यात आली.


अकोले, संगमनेर व राहुरी तालुक्यात युवक, युवतीचे रोजगार, शिक्षण, आरोग्य, दारिद्र्य, रस्ते, वीज पाणी यासारख्या मूलभूत प्रश्नांवर संघर्ष करणार असल्याचे एकनाथ मेंगाळ व गोरख आगीवले यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा