Breaking

जुन्नर : आंबे येथे तहसीलदारांच्या उपस्थितीत 'दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा' गाव सभा संपन्न


जुन्नर : दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी ग्रामपंचायत आंबे येथील रोजगार हमी योजनेचे तालुका कार्यक्रम अधिकारी तथा तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायदा 2005 अंतर्गत मजुरांना रोजगार मिळावा. या रोजगाराच्या माध्यमातून ग्रामपातळीवर शाश्वत मत्ता निर्मिती व्हावी. जल, जंगल, माती संवर्धना बरोबरच गावांमध्ये रस्ते, विहिरी, तळी, शेतीसुधारणा, पर्यटन विकास यासारखी कामे करून कुटुंब-गाव समृद्ध व्हावे. या उद्देशाने पुढील १० वर्षांचा सुक्ष्म कृती आराखडा तयार करण्यासाठी गाव सभा पार पडली. 


महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये एका गावाची निवड करुन यासाठी दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याच्या घेतलेल्या निर्णया मधून रोजगार हमी जुन्नर तालुका आढावा समितीमध्ये आंबे ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली होती. 


यावेळी जुन्नर तालुका तहसीलदार रवींद्र सबनीस साहेब, गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दुर्गेश गायकवाड, कृषी मंडल अधिकारी दत्तात्रय जाधव, किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, आंबे ग्रामपंचायतचे सरपंच मुकुंद घोडे, उपसरपंच अलका काठे, सामाजिक वनीकरण विभागाच्या तृप्ती फल्ले, कृषी सहाय्यक दत्तात्रय मडके, स्नेहल बोकड, ग्रामसेवक लहू भालिंगे, वनरक्षक निलेश विरणक, तालुका रोजगार हमी योजना आढावा समितीचे सदस्य गणपत घोडे, तांत्रिक अधिकारी जितेंद्र भोर, मयुर डोके, किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, रोजगार सेवक संदीप शेळकंदे,  ग्रामपंचायत सदस्य गोविंद रेंगडे, रंजना घोडे, मिरा डगळे, लता कीर्वे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दुर्गेश गायकवाड यांनी या सभेचे प्रास्ताविक करून दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा याबाबतची सविस्तर माहिती दिली. 

तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी पुढील दहा वर्षांसाठी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून यावर अंमलबजावणी करण्यासाठी आंबे ग्रामपंचायतची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून या आराखड्यावर काम करण्यासाठी गावामध्ये ऐक्य निर्माण होणे आवश्यक आहे. याबरोबरच गावाचा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे.

जलसंधारणाचा द्वारे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा मुबलक पुरवठा व्हावा, यासाठी शेततळी विहिरी विहिरींचे पुनर्भरण पाणी आडवा पाणी जिरवा या योजना राबवून सर्वाधिक पाणीसाठा निर्माण करण्याच्या स्पर्धांचे आयोजन ग्रामपातळीवर  करून शेतकरी, मजुर यांना प्रोत्साहन द्यावे. वृक्ष संवर्धन आणि संगोपन या द्वारे वनउपजात वाढ करणे. पर्यावरण संतुलन, पर्यटन विकास यासाठी शाश्वत कामे करता येतील. माती संवर्धनासाठी नाडेप, गांडूळखत, सीसीटी एल.बी.एस. याद्वारे माती अडवणे आणि सेंद्रीय खतांद्वारे जमिनीचा पोत सुधारणे व पिकांची उत्पादकता वाढवणे. अशी कामे करता येतील. पाणंद रस्त्यांचे गावांतर्गत जाळे उभारता येईल. वैयक्तिक योजनांद्वारे गावातील प्रत्येक कुटुंब लक्षाधीश करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाने या योजनेबरोबरच अंमलबजावणीमध्ये देखील सक्रिय सहभागी होणे आवश्यक असल्याचे म्हटले.


मागील अनेक वर्षापासून किसान सभा रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी व्हावी. ग्रामपंचायतमध्ये कामांचा पुरेसा शेल्प तयार करावा. मागेल त्याला मागेल तितकी दिवस, मागेल ते काम मिळावे. यामुळे गावामध्ये शाश्वत मत्ता निर्मिती होईल आणि बेरोजगारीची समस्याही सुटेल यासाठी सातत्याने प्रशासनासोबत पाठपुरावे, संवाद आणि संघर्ष केलेला करत आलेली आहे. आणि दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखड्यात पुढील दहा वर्षे स्थानिक मजुरांना रोजगार निर्माण करण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाची पुणे जिल्हा किसान सभेचे उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे यांनी स्वागत केले.

या गावसभेनंतर  गावांमध्ये जनजागृती प्रभात फेरी करण्यात आली. आणि जनतेशी संवाद करून कामांची यादी तयार करण्यात आली. पुढील दोन दिवसात गाव शिवार भेट आणि कुटुंब सर्वेक्षण करून अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे. सरपंच मुकुंद घोडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा