Breaking

"जागतिक उष्णता वाढ हे शतकातील पृथ्वी पुढील मोठे संकट " - ॲड. गिरीश राऊत
यावर्षी उष्णता असह्य झाली आहे. उष्माघाताने आजारी पडणारांची व मृत्यूंची संख्या वेगाने वाढत आहे. झाडे लावा असा प्रचार होत आहे. परंतु पृथ्वीवर दरवर्षी सुमारे १५०० कोटी झाडे विकासासाठी नष्ट केली जात आहेत. ती जंगलांबरोबर नष्ट होत आहेत. हे जंगल परत मिळवता येणार नाही.


याला उद्योग, वीजनिर्मिती, बांधकाम, वाहतूक व रासायनिक - यांत्रिक शेती कारण आहे. कार्बनच्या ९५% उत्सर्जनास मोटार, वीज व सीमेंट जबाबदार आहेत. झाडे लावा म्हणताना या गोष्टी आपण सोडायला हव्या, याची जाणीव नाही. डोंगर, नद्या वाचवा म्हणताना, रस्ते, हायवे, टाॅवर्स थांबवणे आवश्यक आहे याचे भान नाही . डोंगर आणि रस्ता - महामार्ग एकाच वेळी शक्य नाही.


सन २००९ मधे १००० कोटी टन असलेले व त्याचवेळी कमी करणे वा थांबवणे आवश्यक असलेले कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन  भौतिक प्रगती, समृद्धी व विकासाच्या नावाखाली आता दरवर्षी सुमारे ४००० कोटी टन एवढे वाढले आहे. मिथेन नायट्रोजनची आॅक्साईडस व इतर वायू - द्रव्ये वेगळी. हे उत्सर्जन होत असताना त्या ज्वलनामधे, मोटार ( २०० कोटी मोटारींतील ज्वलन ) व इतर वाहने, औष्णिक ( कोळसा जाळून ) वीज व सीमेंट निर्मितीत, पृथ्वीवरील प्राणवायू व पाणी संपवले जात आहे. महासागर व ध्रुवांवरील, पर्वतांवरील पाणी  व बर्फाची सतत वातावरणात जाणारी वाफ तापमानवाढीला अधिक स्फोटक बनवत आहे. या सर्व विकास नावाच्या भौतिक प्रक्रियेत कार्बन व इतर प्रदूषण शोषणारे आणि प्राणवायू देणारे सागरातील व भूमीवरील झाडे व सूक्ष्मजीवरूपी हरितद्रव्य क्षणोक्षणी नष्ट होत आहे.  ही औद्योगिक जीवनशैली आहे. ती सोडायची की जीवन सोडायचे हा खरा प्रश्न आहे.
आज मोटार, एसी व सीमेंटमुळे आपण जगतो असे आधुनिकांना वाटत आहे. हे शोध लागण्याच्या आधीचे शेकडो, हजारो वर्षांचे जीवन निकृष्ट दर्जाचे होते असे त्यांना वाटते. परंतु त्यांना वास्तवाची जाणीव नाही. या उष्णतेच्या लाटेत पाकिस्तान व भारतात राजस्थानमधे, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे ६२°से तापमान नोंदले गेले. हवेत ते ५५°से पर्यंत गेले. ही गोष्ट पृथ्वीच्या सरासरी तापमानात २°सेची वाढ झाल्याने घडत आहे. मात्र तीन वर्षांनी सन २०२५ मधे सरासरी तापमान ३°से ने वाढणार आहे. त्यावेळी उच्चतम उष्णतेच्या लाटेत पृष्ठभागाचे तापमान ७०°से पर्यंत जाण्याची शक्यता म्हणण्यापेक्षा ते जाईल असे म्हणावे. हवेत ते ६० ते ६५ °से असेल. ५०°से नंतर माणुस जगू शकत नाही. याचा अर्थ ज्याप्रकारे गेल्या १० वर्षांत उष्णतेच्या लाटेत हजारो- लाखो मृत प्राणी, पक्षी व करोडो मासळींचा खच पडत होता, तशी गोष्ट माणसांबाबत  फक्त तीन वर्षांनी घडणे सुरू होणार आहे. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. 


 मानवजातीला फसवले आहे. १.५ °से ची वाढ २१०० सालात होणार किंवा २०५० सालात होणार अशी फसवणूक अर्थव्यवस्थेच्या सूत्रधारांकडून, भाडोत्री  वैज्ञानिक व प्रसारमाध्यमांकडुन केली जात आहे. मात्र त्याचवेळी ५°से वाढीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे अशा वल्गना देखील तेल सम्राटांकडुन केल्या जात आहेत. आता नेते, नोकरशहा, उद्योगपती व अर्थसूत्रधारांना दोष देत बसू नये. ते देखील नष्ट होणार आहेत. 


प्रत्यक्षात दर ५ वर्षांत १°से अशी अभूतपूर्व ऐतिहासिक महाविस्फोटक वाढ सरासरी तापमानात सन २०१५ पासुन होत आहे. सन २०३० मधे ४°से ची वाढ होईल, त्यापुढील वाढीचे गणित आपण करावे. याचे माती, पाणी व इतर संसाधनांच्या नाशात रूपांतर होत आहे. मानवजात व जीवसृष्टीचे उच्चाटन सुरू झाले आहे. ते फक्त  सुमारे २५ वर्षांत क्रमशः पृथ्वीवर सर्वत्र होईल. २५ व्या वर्षी नाही. हे सर्व वैज्ञानिक पुराव्यांसह लिहीत आहे. मी व माझ्या सहकाऱ्यांकडुन आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कोकणासह अनेक भूभाग व जीवन वाचवले गेले आहे. त्यात संकट आधी ओळखुन, 'वरळी - वांद्रे सी लिंक' प्रकल्पात माहिमचा उपसागर बुजवू न दिल्याने खुद्द मुंबई शहर व लाखो लोक २६ जुलै २००५ च्या जलप्रलयात वाचवले गेले आहेत. हे लिहिण्यात अहंकार वा आत्मप्रौढी नाही. जनतेने निराशा व बधिरपणा सोडावा म्हणून हे सांगणे आवश्यक वाटते. 


आपली 'गरज' या शब्दाची व्याख्या पृथ्वीवर लादू नये. निसर्गाची व्याख्या स्वीकारावी. मोटार व एसी ताबडतोब बंद करावे. एखाद्या भागात वीज गेल्यास व वाहतुक बंद असल्यास अजूनही थंडावा अनुभवता येतो. याचा अर्थ अजून वेळ गेली नाही. वीजेचा विचार बिलाच्या रकमेसंदर्भात केला जातो, जळणाऱ्या कोळशातुन  होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनासंदर्भात नाही. दरवाजे, खिडक्या बंद करून वायुवीजन थांबवुन एसी लावला जातो. मग टीव्ही व मोबाईल तर्फे जगाचा संबंध उरतो. त्या परिस्थितीत माणसांचे, समाजांचे नियंत्रण सहज  केले जाते. मग प्रश्नाच्या मुळाशी कुणी जात नाही. उद्योगपती औष्णिक केंद्रांना अधिक कोळसा पुरवण्याची मागणी करतात. माध्यमांचे संपादक त्यांची रि ओढतात. जनता विचारशून्य अवस्थेत असते. 


सन २०५० मधे सर्वांना वीज, मोटार व सीमेंटची घरे उपलब्ध करण्याच्या व विमान प्रवास काही वर्षांत आवाक्यात आणण्याच्या आश्वासनांमधे कौतुकास्पद काही नाही. तो हास्यास्पद पण क्रूर विनोद आहे कारण आता आहे तसे जग चालू राहिले तर २०५० साल कुणी बघणार नाही. अंताची वाटचाल थांबवायची असेल तर हे दुष्टचक्र तोडा. दारे- खिडक्या उघडा, टीव्ही- मोबाईल बंद करा. निसर्ग व माणसांच्या जगात औपचारिकता फेकून पायी फिरून मिसळा. 


 निसर्ग उन्हाळ्यात रसाळ फळे देतो. त्यात समाधानी असावं. त्याऐवजी शेतकरी वीजेचा पंप चालवुन भूजल खेचतो आणि नगदी पिके घेतो. आपण यात चुकतो असे आधुनिकांना वाटत नाही. दोन वर्षांपूर्वी लाॅकडाऊनमधे जंगल, पशु-पक्षी वाढू लागले होते, नदी सागरांना पुनरूज्जीवित होण्याची संधी मिळाली होती, मासळी वेगाने वाढत होती हे सर्वांनी पाहिले आहे. आपण टीव्ही, फ्रीज, वाॅशिंग मशिन, मार्बल ग्रॅनाईटची घरे इ. कृत्रिम गोष्टींचा त्याग केला तर जीवनाची प्राप्ती होऊ शकेल. नाहीतर मानवजात व जीवसृष्टीचे पूर्ण उच्चाटन दोन ते अडीच दशकात अटळ आहे.


उष्णता वाढते म्हणून वीजनिर्मिती वाढवणे, घरात, वाहनात एसी लावणे हा उपाय नाही. फक्त सुमारे शंभर वर्षांपूर्वी  या देशात वाहने, वीज आणि सीमेंट इ. वापरात आले. आपली हजारो वर्षे न तुटलेली चिरंतन तत्त्वज्ञान- अध्यात्मावर आधारित शेती संस्कृती व लाखो करोडो वर्षांचे सजीव म्हणून अस्तित्व आपण केवळ मनाच्या इच्छांमुळे, गफलतीने तंत्रज्ञानाला विज्ञान मानण्याच्या चुकीमुळे गमावणार काय? पृथ्वीची, निसर्गाची इच्छा मानू. आपल्या शरीरातील २० ते २५ लाख कोटी पेशी म्हणजे आपण आहोत. त्या पृथ्वीच्या निसर्गाच्या ईश्वराच्या वा तत्वाच्या इच्छेप्रमाणे चालत आहेत जसे की आपले ह्रदय आपली इंद्रिये. आपले मन, बुद्धी वा अहंकार म्हणजे आपण नाही. 


माणुस स्वतःचे आचरण बदलण्याचा, खरे तर अत्यंत सोपा व स्वतःच्या हातात असलेला परंतु क्रांतिकारक उपाय करून मानवजातीला व जीवसृष्टीला वाचवू शकतो.  मग तो अतिशय कठीण कृत्रिम वस्तु व पदार्थांची निर्मिती करून व त्यांच्या आहारी जाऊन आपले अस्तित्व का नष्ट करून घेत आहे?

बिनखर्चाची नैसर्गिक शेती, चरखा - हातमागावरील वस्त्र आणि माती - बांबू व कुडाच्या घरात तो जास्त सुखात राहू शकतो व एकमेव पृथ्वी ग्रहाने त्याचे काही कर्तृत्व नसताना दिलेले अस्तित्व, जीवन सुरक्षित ठेवू शकतो. तंत्रज्ञान व अर्थव्यवस्थारूपी मायाजाळात अडकल्याने, निसर्गाविरोधात वागण्याची व त्यात भूषण मानण्याची शिकवण नकळत मिळाल्याने त्याला साधा, सरळ, निरागस उपाय समजत नाही


मात्र हा उपाय करण्याच्या दृष्टीने प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. आपल्या बालकांच्या डोळ्यातील जगण्याची इच्छा पहा. त्यांच्या जीवन गमावण्याला तुम्ही जबाबदार आहात. ही  त्यांची तुम्ही केलेली हत्या असणार आहे.


अॅड. गिरीश राऊत

निमंत्रक

भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ

दू. ९८६९ ०२३ १२७


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा