Breaking

असंघटीत कामगारांच्या जिल्हावार सभा घेणार - औरंगाबाद येथील राज्यव्यापी बैठकीत निर्धार


औरंगाबाद : महाराष्ट्र राज्यात दुर्लक्षित असलेल्या असंघटित कामगारांना पटलावर आणण्यासाठी म्हणून त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षा लागू करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील घटकांना सोबत घेऊन प्रत्येक जिल्ह्यावर सभा घेतली जाणार आहे. तसेच एक मोठी राज्यव्यापी मुंबई येथे घेतली जाणार असून त्या सभेद्वारे असंघटित कामगारांचे प्रश्न योग्यरित्या शासन दरबारी मांडून मंजूर करून घेण्याचा निर्धार करण्यात आला. असंघटीत कामागार संघर्ष समितीतर्फे आज एन सेव्हन सिडको हॉल, औरंगाबाद येथे राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वानुमते एकमताने हा ठराव करण्यात आला. तसेच 'जो पाच कोटी कष्टकऱ्यांबद्दल बोलेल, त्याचेच राज्यात सरकार चालेल,. असा नारा ही यावेळी देण्यात आला आहे.


यावेळी ऊसतोड कामगारांचे कॉ. डॉ. डी. एल. कराड, सर्वहारा संघटनेच्या उल्का महाजन, कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते, हमाल मापाडी मंडळाचे सुभाष लोमटे, निमंत्रक बिलाल खान, राजू भिसे, घरेलू कामगार समितीचे राजू वंजारे, नॅशनल हॉकर फेडरेशनचे मैकंजी डाबरे, घर हक्क संघर्ष समितीचे हिरामन पगार, यांचेसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


महिला - पुरुष समान काम समान वेतन याची अंमलबजावणी झाली पाहिजे, महिलाची अवहेलना थांबवून समान न्याय त्याचबरोबर सर्व असंघटित कामगारानां ई एस आय सी च्या अंतर्गत विविध योजनांचा लाभ दिला गेला पाहिजे, महिलांना मातृत्व योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, ऊसतोड कामगार,  शेतमजूर, सफाई कामगार अशा सर्व घटकांसोबत त्यांच्यामध्ये जनजागृती करून केंद्र सरकारने केलेल्या अन्यायकारक कामगार कायद्याच्या विरोधात लढाईस सज्ज करणे आणि तशाच कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळ, मंत्री यांना भेटून तसे निवेदन देऊन चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी कामगार विरोधी कामगार कायदे महाराष्ट्रात करण्यात येऊ नये हि आग्रहाची मागणी देखील करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील जिल्हावार बैठका - मेळावे याचे आयोजन करून त्यानंतर मुंबईमध्ये राज्यव्यापी महामेळावा घेऊन त्यानंतर मागण्यां राज्यशासनाकडे देण्याचे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले. प्रस्ताविक बिलाल खान यांनी केले, तर आभार ओमप्रकाश मोरया यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा