Breaking

कामगार दिनी घणाघात ! सरकारे आली, गेली पण कामगारांचे प्रश्न सुटले नाहीत - यशवंत भोसले


पिंपरीत "कामगार अस्तित्व रॅली'त हजारो कामगार सहभागी 


पिंपरी चिंचवड : महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर अनेक सरकारे आली, गेली पण कामगारांचे प्रश्न सुटले नाहीत. कामगारांना न्याय मिळाला नाही.ही देशाची मोठी शोकांतिका आहे. कामगार दारात आला की मंत्र्यांच्या कपाळावर आट्या पडतात. पण, कंपनीचा मालक आला की त्यांच्यापुढे पायघड्या घातल्या जातात. सहा-सहा महिने आंदोलने करुनही कामगारांना न्याय मिळत नाही. मालकांना मात्र न्याय मिळतो. अधिका-यांच्या हातात देश गेला आहे. मंत्री त्यांना पाहिजे ते काम अधिका-यांकडून करुन घेतात. त्यांना समाजाचे काही घेणेदेणे नाही'', असा घणाघात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले कामगार दिनी केला.

धार्मिक आरोप-प्रत्यारोप, राजकीय दंगा थांबवून  श्रमिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे कामगारदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात भव्य 'कामगार अस्तित्व रॅली' आयोजित करण्यात आली होती.


संत तुकारामगर येथे झालेल्या सभेला राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश जेधे, अनिल कोंडे, उद्योजकांचे अध्यक्ष दिपक पाटील, राहुल शितोळे, अनिकेत भोसले, एकनाथ गायकवाड, साहेबराव भोसले, अमोल कार्ले, सिद्धार्थ कारखे, स्वानंद राजपाठक, उत्तमराव वाघमारे, दत्ता गायकवाड, सतिश एरंडे, नंदू खैरे, विलास ठोंबरे, हनुंमत जाधव, संजय साळुंखे, विठ्ठल ओझरकर, आबा खराडे, शंकर गावडे, दिपक पलंगे, संतोष टाकळे, यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या संत तुकारामनगर येथील कार्यालयापासून सकाळी 10 वाजता भव्य रॅलीला सुरुवात झाली. हजारो कामगार रॅलीत सहभागी झाले होते. कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. संत तुकारामगर पोलीस चौकी समोरुन - नेहरुनगर चौक - कामगारनगर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात रॅली आली. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तेथून पिंपरी चौक - कामगारनगर - नेहरुनगर - संत तुकाराम महाराज पोलीस चौकीसमोरुन संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान येथे रॅलीची सांगता झाली. सुमारे 300 दुचाकी, टेम्पो, ट्रक, कार, अॅटो या वाहनांच्या माध्यमातून 3 हजार कामगार या रॅलीत सहभागी झाले होते. सुमारे अडीच तास ही रॅली चालली. संत तुकारामनगर येथे रॅलीचे सभेत रुपांतर झाले.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा