Breaking

व्यक्तिचित्रातील माणूसपण महत्त्वाचे - डॉ. श्रीपाल सबनीस


पुणे : ‘‘मी डावा किंवा उजवा नाही, तर मी संवादावर भर देणारा माणूस आहे. मला वाटतं, डाव्या-उजव्यांनी आपलं आत्मपरिक्षण केलं पाहिजे, आणि जे चांगलं आहे, ते स्वीकारलं पाहिजे. या दोघांच्या संवादातून देशाचं भलं करण्याचा विचार मला महत्त्वाचा वाटतो’’ असे प्रतिपादन डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.


मातंग साहित्य परिषद आणि विवेक यांच्या संयुक्त विद्यमाने गिरीश प्रभुणे लिखित ‘परिसांचा संग’ या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील सावरकर स्मारक केंद्र येथे रविवार, 1 मे 2022 ला पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. 


डॉ. सबनीस पुढे म्हणाले की, ‘‘राजकीय, सामाजिक, धार्मिक कोंडी फोडण्याचं काम या पुस्तकाने केलं आहे. सेवा आणि समर्पण याला जातधर्म नसतो. हे समर्पण गिरीश प्रभुणेंनी सिद्ध केलं आहे. पुस्तकातील व्यक्तिचित्रणांविषयी बोलताना त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणतात, मा. भैयाजी जोशी भटके-विमुक्ताच्या एखाद्या पाल्यामध्ये जाऊन चटणी-भाकरी खातात. तिथे समतेचा प्रत्यय दिसतोच. ही कृती स्वागतार्हच आहे. अशी काही माणसं माणूसकीचा, संवेदनशीलतेचा इतिहासात घडवित आहेत’’ असे श्रीपाल सबनीस म्हणाले.


यावेळी व्यासपीठावर डॉ.आंबादास सगट, अविनाश कोल्हे, प्रमोद आडकर, राजन लाखे, डॉ.अविनाश सांगोलेकर, राजू अस्वरे, अशोक लेखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे संयोजन डॉ.धनंजय भिसे यांनी केले. मीनाक्षी सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर शीतल खोत यांनी मान्यवरांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आसाराम कसबे, धनाजी जाधव, शिवाजी पौळ इत्यादींनी परिश्रम घेतले.


- क्रांतिकुमार कडुलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा