Breaking

रिक्षाचालकांना भाडेवाढ द्या - पेट्रोल गॅससह जीवनावश्यक वस्तू दर वाढले, भाडेवाढ कधी?


पिंपरी चिंचवड : गेल्या अनेक दिवसापासून  महागाईचे चटके सर्वसामाण्यांना बसत आहेत, खाद्य पदार्थ पासून ते दैनंदिन लागणाऱ्या वस्तू पर्यंत गेल्या आठ वर्षात महागाईने उच्चांक गाठला आहे. खाद्यपदार्थांची महागाई ८.३८  टक्के झाली आहे. त्यातच रेपोदरात ४० टक्के वाढ झाली. मागील वर्षी मे महिन्यात पेट्रोल दर ७८ रुपये होता, आता १२२ वर गेला आहे, तर सीएनजी गॅस ६२ रुपये होता आता ७७.२० रुपये झाला आहे. सर्व वस्तू व सेवांचे दर वाढत आहेत मात्र आमच्या रिक्षाचालकांचे भाडेवाढ कधी होणार ? असा सवाल करत याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र व सारथी चालक-मालक महासंघाच्या वतीने आज पिंपरी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.


यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, निमंत्रक राम बिरादार समाजिक कार्यकर्ते नाना कसबे, महादेव सोनवणे, अनंत कदम, आतिश वडमारे, बबन हिवाळे, मार्तंड कांबळे, राजकारण पटेल, ओमप्रकाश मोरया विशाल रिटे आदी सह रिक्षाचालक उपस्थित होते.


नखाते म्हणाले की महागाईच्या भडक्यात या आगीमध्ये सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. ज्यांचे हातावर पोट आहे अशा लाखो कुटुंबांना महागाईचा तडाखा बसला असून केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे मध्यमवर्गीय व सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.त्यातच रिक्षाचालकांना परतीचे भाडं मिळत नाही.

बस, ट्रॅव्हल, टूरिस्ट असो वा रेल्वे यांचे प्रवासी दर वाढवण्यात आले. मात्र, रिक्षाचालकांचे अजूनही वाढवण्यात आले नाहीत यासाठी आरटीओ व राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. दिड  वर्षाच्या कोरोना च्या कालावधीपासून रिक्षाचालकांचे अनेक हप्ते, देणी थकलेल्या असून आणि स्वतः कमवून हे सगळं कर्जफेड आणि कुटुंब चालवायचे अशा दुहेरी अडचणीतून रिक्षाचालक जात असताना त्यांना भाडेवाढ होणे  गरजेचे आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या मीटर दरवाढ होणे गरजेचे आहे.


सध्याचे मीटरचे दर पहिल्या दीड किलोमीटर २१ रुपये तर पुढील प्रत्येक किलोमीटरचा १४  रुपये आहे. राज्य परिवहन खात्याकडून महागाई निर्देशांका प्रमाणे रिक्षाचालकांची भाडेवाढ निश्चित करावी. ओला, उबर सह ॲप बेसवरील दरात ही वाढ व्हावी यासाठी त्यांचेकडे ही मागणी केली जाईल. रिक्षा चालकांची वाढलेली संख्या आणि असलेली स्पर्धा याचा ताळमेळ लावून भाडेवाढ करणे अत्यंत गरजेचे आहे. 

राम बिराजदार म्हणाले की बऱ्याच वेळेला परतीचे भाडे मिळत नाही त्यामुळे  रिकामी गाडी परत आणावे लागते त्याने  भागत नाही. म्हणून सकाळी पहाटे उठून लवकर आम्ही व्यवसाय सुरु करतो आणि संध्याकाळच्या काही प्रमाणात व्यवसाय होतो. सध्या उन्हामुळे दुपारच्या वेळेला तर बसूनच राहावे लागते अशा काळात दर वाढ होणे गरजेचे आहे. प्रस्तावना राजेश माने यांनी केली सूत्रसंचालन मधुकर वाघ तर आभार सुरेश भोसले यांनी मानले.

- क्रांतिकुमार कडुलकर
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा