Breaking


जुन्नर : घाटघर येथे रोजगार हमी योजनेच्या कामांना सुरुवात


पुणे : घाटघर येथे रोजगार हमी योजने माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी घाटघर येथे कामाचे उद्घाटन सरपंच काळू लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, तालुका सचिव लक्ष्मण जोशी, किसान सभेचे सदस्य रोजगार सेवक नारायण वायाळ, शिवाजी लोखंडे, मंगलताई रढे, सुभाष आढारी यांसह मोठ्या प्रमाणावर मजुर महिला ग्रामस्थ उपस्थित होते.


यावेळी बोलताना विश्वनाथ निगळे म्हणाले, जुन्नर तालुक्यामध्ये रोजगार हमीची कामे सुरू करून मागेल त्याला गावातच रोजगार मिळावा यासाठी किसान सभेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी घाटघर गावातील महिला बचत गटांच्या विनंतीवरून किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी रोजगार हमी योजना कायदा जनजागृती मेळावा घेतला. या मेळाव्यात एकूण ६५ मजूरांनी कामाची नोंदणी पंचायत समिती जुन्नर येथे केली. आणि २ मे २०२२ पासून काम मिळावे यासाठी मागणी नोंदविली. मागणी केलेल्या तारखेला काम सुरू न झाल्याने संघटनेने अंमलबजावणी यंत्रणेकडे पाठपुरावा केला. त्यानंतर दिनांक १२ मे २०२२ रोजी या ठिकाणी मजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम मिळाले. 

रोजगार हमी योजना कायद्याने मागेल त्याला गावातच काम मिळण्याचा अधिकार मिळाला आहे. परंतु सरकारी यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे हजारो आदिवासी मजुरांना रोजगारासाठी (येण्या-जाण्यासाठी) ८० ते १०० किलोमीटर प्रवास करावा लागतो. आणि २४ तासातील १४ ते १६ तास खर्च होतात. याचा विपरीत परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होत असतो. कुटुंबाची हेळसांड होत असते. कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी वर्षभर मजुरीवर अवलंबून असणारी आदिवासी कुटुंबे वर्षानुवर्षे बागायती शेती वर मजुरीसाठी अवलंबून असतात. आणि येथील कामे संपल्यावर रोजगाराविना घरीच बसून असतात. या भागांमध्ये अनेक प्रकारचे रोजगार हमीतून करण्यायोग्य कामे उपलब्ध आहेत, असेही निगळे म्हणाले.

लक्ष्मण जोशी म्हणाले, गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि शाश्वत रोजगार निर्माण करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून अनेक कामे करता येऊ शकतात. परंतु लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना रोजगार हमी कायद्याच्या माहिती अभावी तसेच प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे वर्षांनुवर्षे मजूर स्वतःचे गाव सोडून इतरत्र रोजगारासाठी भटकत असल्याचे चित्र दिसते आहे. किसान सभेच्या माध्यमातून गावपातळीवर नागरिकांना कायद्याचे शिक्षण आणि प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणीसाठी सातत्याने संघर्ष करावा लागत आहे. जलसंधारण, वनसंवर्धन, पायाभूत सुविधांचा विकास, पर्यटन विकास, शेती सुधारणा आणि कायमस्वरूपी शाश्वत रोजगार या बाबींवर रोजगार हमीच्या माध्यमातून सातत्याच्या अंमलबजावणीमधून निश्चितपणे तोडगा निघू शकतो.

रोजगार हमी योजनेतून प्रत्येक कुटुंब लखपती आणि आत्मनिर्भर करण्यासाठी शासन वरिष्ठ पातळीवर योजना आखत आहे. परंतु या योजनांची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होत नाही, शासनाची योजना नागरीकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून हजारो कुटुंबे यापासून वंचित राहत आहेत.

किसान सभेच्या पुढाकारातून मजुरांमध्ये कायद्याबाबत जनजागृती करणे, मजुरांना गावातच कामासाठी प्रोत्साहित करणे आणि मजूर तयार झाल्यावर प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील शेकडो कुटुंबांना रोजगार मिळाला असल्याचे संघटने तालुका सचिव लक्ष्मण जोशी यांनी सांगितले.

रोजगार हमी योजनेतुन मजुरांना काम उपलब्ध करुन दिल्याबद्दल अंमलबजावणी यंत्रनेचे आभार संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे यांनी मानले. तसेच तालुका सदस्य नारायण वायाळ यांनीही उपस्थित मजुरांना मार्गदर्शन केले. गावातच काम मिळाल्याने मजुरांनी समाधान व्यक्त करुन संघटनेचे आभार मानले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा