Breaking


Maharashtra ZP Election : राज्यात पुन्हा निवडणूकीची रणधुमाळी रंगणार, राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा


मुंबई, दि. 11 : पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील (Panchayat Samiti) 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी (By-election) 5 जून 2022 रोजी मतदान; तर 6 जून 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commision) आज केली.


नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण (ता. बाळापूर) या निवडणूक विभागासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. पोशेरा (मोखाडा, जि. पालघर), हिसाळे (शिरपूर, जि. धुळे), हट्टी खु. (साक्री, जि. धुळे), असली (अक्राणी, जि. नंदुरबार), ब्राम्हणवाडा न- मारसुळ (मालेगाव, जि. वाशीम) आणि चणकापूर (सावनेर, जि. नागपूर) या पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील मतदान होईल. 

संबंधित निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणांत आजपासून आचारसंहिता लागू झाली असून निकाल जाहीर होईपर्यंत ती लागू राहील. नामनिर्देशनपत्र 17 ते 23 मे 2022 या कालावधीत दाखल करता येतील. 22 मे 2022 रोजी रविवारच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 24 मे 2022 रोजी होईल. 5 जून 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 6 जून 2022 रोजी सकाळी 10.00 वा. सुरू होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा