Breaking

महात्मा गांधींच्या विचार-कार्यासाठी उभारल्या गेलेल्या संस्था वाचवण्याचा निर्धार - 120 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप


कोल्हापूर : "सर्वोदय" - महात्मा गांधीजींची सर्वांग सुंदर कल्पना! ज्यात सर्वांचा उत्कर्ष, सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास अपेक्षित! तर, शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचला पाहिजे अशी भूमिका म्हणजे अंत्योदय ! महात्मा गांधीजींच्या या तत्वांचा प्रचार प्रसार करण्यासाठी व ही तत्वे कृतीत उतरविण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात ज्या संस्था जिल्ह्याजिल्ह्यात स्थापन झाल्या, त्या संस्था म्हणजे खादी ग्रामोद्योग, सर्वोदय मंडळ!

 
"पण या संस्थांमध्ये कालौघात स्वातंत्र्य सैनिकांऐवजी  घुसलेल्या काही नथुरामी प्रवृत्तींनी गांधींच्या तत्वाला हरताळ फासत नथुरामी विचारांची कृत्ये करत अनेक ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे. कोल्हापुरात देखील रुईकर कॉलोनी येथील साडेपाच एकर जागेमध्ये 120 कोटींहून अधिक रुपयांचा गैरव्यवहार केला गेला असल्याचा गंभीर आरोप विविध पक्ष, संघटनांच्या बैठकीत करण्यात आला आहे.


गांधी विचारांची जिवंत स्मारक व्हावीत; त्याद्वारे लोकांना ग्रामोद्योगातून रोजगार मिळावा म्हणून जवाहरलालजी नेहरू, विनोबाजी भावे यांनी स्वतः  रुईकर कॉलोनी येथील जागेला भेट दिली होती. ही ऐतिहासिक जागा कवडीमोल दरात भांडवलदारांच्या घशात घातली जात आहे. शिवाय, तेथे 30-40 वर्षे रहिवासी असलेल्या मूर्तिकार कुटुंबांवर रुईकर कॉलनी रस्त्यावर पत्रे उभारून मागील बाजूने बुलडोझर फिरवला जात आहे. त्यांची वापरातील विहीर मुजवली जात  आहे. गुंडा पुंडांकडून महिला व वृद्धांना धमक्या दिल्या जात आहेत. अर्वाच्य शिवीगाळ केली जात आहे.  मारहाण केली जात आहे, असा गंभीर आरोपही केला आहे. हे सर्व होत आहे ते गांधी विचार 'धारण' केलेल्या संस्थेच्या पुढाकाराने! हे सर्व अत्यंत खेदजनक आहे, असेही म्हटले आहे.

यासंबंधी कलेक्टर, एसपी यांना काल दिनांक १० मे रोजी विविध संघटनांनी निवेदन दिले आहे. तरीही, संस्थेचे अध्यक्ष सुंदर देसाई यांनी आज ११ मे रोजी "जागा खाली करा अन्यथा जेसीबी लावू" अशी धमकी दिली असल्याचा आरोप करण्यात आला असून "शाहू स्मृती शताब्दी वर्ष चालू आहे, प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा अजूनही आम्ही बाळगली आहे" अशी भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे.


रुईकर कॉलोनीतील चळवळीची ही जागा कवडीमोल दरात भांडवलदारांना विकली जाऊ नये व झालेला व्यवहार रद्द करून ही जमीन शासनाने ताब्यात घ्यावी. याठिकाणी  तरुणांना रोजगार देणारे गांधी विचारांचे "जिवंत स्मारक" व्हावे, यासाठी कोल्हापुरातील स्वाभिमानी, जागरूक नागरिकांनी एकत्र येत मावळा कोल्हापूरच्या कार्यालयात बैठक घेतली. त्यात "महात्मा गांधी विचार संरक्षण मंच" ची स्थापना करण्यात आली. बैठकीत गांधी संस्थांमध्ये घुसलेल्या नथुरामी प्रवृत्तींना हद्दपार करण्याचा निर्धार करण्यात आला. शिवाय, 30-40 वर्षे रहिवासी असलेल्या मूर्तिकार समाजाला संरक्षण देण्याचे ठरले. गांधी विचार आणि संस्था वाचवण्यासाठी आंदोलन उभारण्याचे ठरले.

पुरोगामी चळवळीचे नेते कॉ. चंद्रकांत यादव, कॉ. अतुल दिघे, ॲड. अजित चव्हाण, ॲड. रविराज बिरजे यांनी मार्गदर्शन केले. 


बैठकीला मावळा कोल्हापूर, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, लाल निशाण पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिव-शाहू विचार मंच चे कार्यकर्ते, तसेच ॲड. सुनिल भोसले,  ॲड. कार्तिक पाटील, सुनंदा चव्हाण, संतोष हेब्बाळे, अनिकेत सावंत, युवराज पाटील, उदयसिंह देसाई उपस्थित होते. प्रस्तावना अभिषेक मिठारी यांनी केली तर आभार ओमकार नलवडे यांनी मानले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा