Breaking

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, पाण्याच्या टाकीच्या राजकारणात राष्ट्रवादीला चपराक !मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने माजी नगरसेवक राजेंद्र लांडगेंचा लढा यशस्वी


महापालिकेने तांत्रिक बाजु पडताळून दोन वर्षांत टाकी उभारण्याचे न्यायालयाचे आदेश

पिंपरी चिंचवड : इंद्रायणी नगर, धावडेवस्ती, भगतवस्ती आणि गुळवेवस्ती भागातील सुमारे ५० हजारहुन अधिक कुटुंबियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या पाणीच्या टाकीच्या उभारणीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. तांत्रिक बाजुंची पडताळणी करुन पाण्याची टाकी उभारावी, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या टाकी संदर्भातील राजकीय संघर्षात भाजपाचे माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी दिलेला लढा यशस्वी झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत पेठ क्रमांक १ प्लॉट क्रमांक ४ येथे १९३३.०३ या मोकळ्या जागेवर पाण्याची टाकी (जलकुंभ) उभारण्याचा प्रस्ताव क- प्रभाग समितीमध्ये दि.५ नोव्हेंबर २०१८ रोजी (ठराव क्रमांक ३८) मंजुर केला होता. महापालिका प्रशासनाने त्याचे कार्यादेशही दिले होते. मात्र, राजकीय दबावापोटी आणि श्रेयवादातून संबंधित टाकीचे काम प्रलंबित ठेवण्यात आले. हा वाद न्यायालयात पोहोचला होता.


याबाबत माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे म्हणाले की, संबंधित पाण्याच्या टाकीचे काम थांबवण्यात यावे, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या एका बैठकीत महापालिका प्रशासनाला दिल्याचे लेखी पत्र समोर आल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. वास्तविक, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपा सत्ताकाळात सुरू झालेल्या विकासकामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी उपमुख्यंत्री अजित पवार यांची दिशाभूल करण्यात येत आहे. परिणामी, न्यायालयात प्रकरण गेल्यामुळे विकासकामे रखडली जात आहे.

नागरिक राष्ट्रवादीला थारा देणार नाहीत : लांडगे

न्यायालयाच्या आदेशानुसार, दोन वर्षांत पाण्याची टाकी उभारण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी. निविदा प्रक्रिया आणि अन्य बाबींची पूर्तता झाली आहे. काही अंशी कामही झाले आहे. त्याच ठिकाणी काम वेगाने सुरू करणे अपेक्षीत आहे. भगतवस्ती- गुळवेवस्ती, धावडेवस्ती आणि इंद्रायणीनगर परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने पाण्याची टाकी उभारणे अत्यावश्यक आहे. मात्र, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि संजय उदावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिशाभूल केली. त्यामुळे पाण्याच्या टाकीला खोडा बसला. वास्तविक, दिघी आणि चिखलीमध्ये त्याच काळात सुरू झालेले पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण होवून लोकार्पणही झाले आहे. दोन वर्षे राष्ट्रवादीच्या आडमुठेपणामुळे पाण्याच्या टाकीचे काम रखडले आहे. आता हेच इच्छुक उमेदवार आगामी निवडणुकीत मतांचा जोगवा मागतील. मात्र, परिसरातील नागरिक त्यांना थारा देणार नाहीत, असा घणाघातही माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी केला आहे.

- क्रांतिकुमार कडुलकर
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा