Breaking

मनपा निवडणूक : अंतिम प्रभाग रचनेला आयोगाची मंजुरी


प्रभाग क्रमांक 2, 12, 3, 5, 11, 7, 26 आणि 27 मध्ये बदल


चऱ्होली, चिखली, इंद्रायणीनगर, प्रेमलोकपार्क सह आठ प्रभागात किरकोळ बदल

पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यास राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि. 12) मंजुरी दिली असून अंतिम आराखडाही जाहीर झाला आहे. एकूण 5 हजार 684 हरकती व सूचना असतानाही मोजके बदल करण्यात आले असून बदलांसह अंतिम आराखडा महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. चऱ्होली, चिखली, इंद्रायणीनगर, प्रेमलोकपार्क या प्रभागात किरकोळ फेरबदल करण्यात आले आहेत.

महापालिकेने त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा 1 फेब्रुवारीला प्रसिद्ध केला होता. त्यात तीन सदस्यांचे 45 व चार सदस्यांचा एक असे एकूण 46 प्रभाग आहेत. एकूण 139 नगरसेवकांची संख्या असणार आहे. त्या आराखड्यावर 14 फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती मागविण्यात आल्या. 5 हजार 684 हरकती व सूचनांवर 25 फेब्रुवारीला प्राधिकृत अधिकारी अनिल कवडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांचा अहवाल 2 मार्चला राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला. 


मात्र, दरम्यानच्या काळात ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्याने राज्य सरकारने विधीमंडळात कायदा पारित करून प्रभाग रचनेचे अधिकार स्वतःकडे घेतले होते. मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले. 

महापालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी प्रभागरचनेच्या अंतिम आराखडा निवडणूक आयोगाचे आयुक्त यूपीएस मदान यांच्यासमोर गुरुवारी सादर केला. त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली असून, त्यास गुरुवारी मंजुरी दिली आहे. 


राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी मिळताच महापालिकेच्या निवडणूक विभागाने हा अंतिम आराखडा प्रसिद्ध केला आहे. प्रारुप आरखड्यामध्ये प्रभाग क्रमांक 2. 12, 3, 5, 11, 7. 26 आणि 27 मध्ये बदल करण्यात आले आहेत. बदलानुसार काही भाग जोडून शेजारच्या प्रभागाला जोडण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रभागांच्या लोकसंख्येत बदल झाला आहे. हे किरकोळ बदल वगळता इतर कोणत्याही प्रभागात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

राज्य निवडणूक आयोगाने आज अंतिम आराखडा जाहीर करतानाच आरक्षणाबाबतही निर्णय घेण्याचे सूतोवाच केले आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात आरक्षणाचाही निर्णय अंतिम होण्याची शक्यता असून आरक्षणाचा कार्यक्रम निवडणूक आयोग लवकरच घोषित करण्याची शक्यता आहे. तसेच आजच्या आदेशामध्येच इव्हीएम मशीनही दुरुस्तीचे कामकाज हाती घेण्याबाबत सूचविण्यात आले आहे.

- क्रांतिकुमार कडुलकर
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा