Breaking

१२ दिवसानंतर राणा दाम्पत्याची रुग्णालयात भेट, नवनीत राणांना अश्रू अनावर


मुंबई : मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याच्या अट्टाहासामुळे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. अखेर बारा दिवसांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.


आज सकाळी भायखळा तुरुंगातून नवनीत राणा यांची सुटका झाल्यानंतर त्यांना थेट लीलावती रुग्णालयात उपचारासाठी गेल्या. तुरुंगातील १२ दिवसांच्या वास्तव्यामुळे नवनीत राणा यांच्या अनेक शारीरिक व्याधी उफाळून आल्या आहेत. त्यामुळे लीलावती रुग्णालयात त्यांची प्राथमिक तपासणी करून नवनीत राणा यांच्यावर पुढील उपचार केले जातील.


नवनीत राणा यांच्या सुटकेनंतर सुमारे ५ ते ६ तासांनी रवी राणा यांची तळोजा तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर रवी राणा आपल्या पत्नीच्या भेटीला लीलावती रुग्णालयात पोहोचले. मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर रवी राणा यांना तळोजा तर नवनीत राणा यांना भायखळा येथील महिला तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेव्हा पासून राणा दाम्पत्याची भेट झाली नव्हती. आज तुरुंगातून सुटका झाल्यानंतर रुग्णालयात राणा दाम्पत्याची भेट झाली, त्यावेळी नवनीत राणा यांना अश्रु अनावर झाले.नवनीत राणा यांना रक्तदाब, मणक्याच्या दुखणे आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवत आहे. काल जे.जे. रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती अद्याप सुधारली नसल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.


राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. संबंधित विषयावरून माध्यमांशी संवाद साधू नये, अशी अट न्यायालयाकडून घालण्यात आली आहे. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रवी राणा माध्यमांशी काहीही बोलले नाहीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा