Breaking

पिंपरी चिंचवड मधील सरकारी आरोग्य व्यवस्था मजबूत करा - ॲड.सचिन गोडांबे


पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मधील सरकारी आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व मुक्त पत्रकार ॲड.सचिन गोडांबे यांनी उपमुख्यमंत्री, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, वैद्यकीय संचालक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीमध्ये तेथील सरकारने सर्वत्र सरकारी, दर्जेदार सेवा देणारी मोहल्ला क्लिनिक सुरु केली आहेत, जेथे सरकारी डॉक्टर रुग्णांची केवळ मोफत तपासणीच करत नाही तर गोळया औषधेही मोफत दिली जातात. केरळ मध्येही अशीच मजबूत सरकारी आरोग्य व्यवस्था आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेनेही आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी खालील उपाययोजना तातडीने कराव्यात, असे म्हटले आहे.


1. महापालिका हद्दीतील सर्व गावांमध्ये किमान 5  कम्युनिटी वा मोहल्ला क्लिनिक सुरु करावेत व तेथे तद्य डॉक्टरची नेमणूक करून जनरिक औषधेही तेथेच उपलब्ध करून द्यावीत ज्यामुळे महापालिका हॉस्पिटल OPD वरील ताण कमी होईल. पिंपरी चिंचवड मधील सर्व झोपडपट्टी मध्ये अशी क्लिनिक सुरु करण्यात यावीत जेथे गरिबांना मोफत तपासणी + औषधं दिली जातील.

2. YCM सारखी मोठी हॉस्पिटल्स अजून किमान 5-10 वेगवेगळ्या ठिकाणी बांधण्यात यावीत व त्यासाठी बजेट मध्ये तरतूद करण्यात यावी. शहरात विविध ठिकाणी हॉस्पिटल साठी पालिकेने जागा आरक्षित केलेल्या आहेत त्याचा वापर करण्यात यावा. अजून मोकळ्या जागी हॉस्पिटल साठी आरक्षण टाकण्यात यावे व त्याचाही वापर करण्यात यावा. उदा. भोसरीतील सर्व्हे नं. 1 सहल केंद्राजवळ प्रचंड जागा असतानाही खूप छोटे हॉस्पिटल पालिकेने बांधले आहे व इतर ठिकाणी गरज नसलेल्या गोष्टींसाठी कोट्यवधी रू. खर्च केले जात आहेत. या ठिकाणी YCM सारखे मोठे हॉस्पिटल बांधण्यात यावे.


3. महापालिका हॉस्पिटल्स मधील सध्याच्या OPD चे टायमिंग वाढवून ती सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत खुली राहील याप्रमाणे व्यवस्था करण्यात यावी तसेच या ठिकाणी नागरिकांकडून घेण्यात येणारे केसपेपर व गोळया औषधे यांचे पैसे घेणे बंद करण्यात यावे.

4‌. गर्भवती महिलांसाठी तसेच इतरांसाठी ही पालिकेने आपल्या सर्व हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून द्यावे व त्यासाठी गर्भवती महिलांना कोणतेही शुल्क आकारू नये. इतरांना अत्यल्प शुल्क (100 रू.) आकारावे. खासगी सोनोग्राफी वाले 1000 ते 1200 रू. घेत आहेत. एक्स रे मशीन ही उपलब्ध करून द्यावे व नागरिकांना स्वस्तात एक्सरे करून द्यावेत.


5. YCM हॉस्पिटल मधील नियोजित मेडिकल कॉलेज मध्ये केवळ आलोपॅथीचे अभ्यासक्रम न ठेवता आयुर्वेदिक तसेच निसर्गोपचार (Naturopathy) चे अभ्यासक्रम ही ठेवावेत. तसेच नर्सिंगचे कोर्सेस ही सुरु करण्यात यावेत. तद्य प्राध्यापक ही नेमावेत.

6. YCM मधील विविध खरेदी मधील कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवून तेथील खरेदीचे दरवर्षी ऑडिट करण्यात येऊन त्याची सर्व माहिती जनतेसमोर ठेवावी.


7. महापालिकेने सर्व हॉस्पिटल मध्ये स्वतः च्या ब्लड बँक सुरु कराव्यात जेणेकरून नागरिक खासगी ब्लड बँकेतून महागड्या रक्त पिशव्या खरेदी करणार नाहीत. दर 3 महिन्यांनी रक्तदान शिबीर घेण्यात यावे.

8. महापालिकेने सर्व हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी व अन्य अनेक तपासण्या करण्यासाठी स्वतः च्या लॅब सुरु कराव्यात व तेथे स्वस्तात या सर्व तपासण्या कराव्यात म्हणजे खासगी महागड्या लॅब मध्ये नागरिक जाणार नाहीत.


9. YCM हॉस्पिटल मधील पहिल्या मजल्यावरील खासगी रुबी अल्केअर सारखे लाखो रू. बिल करून लुटणारे प्रकार बंद करण्यात यावेत व पालिकेने स्वतः ते चालवावे. सरकारी हॉस्पिटल मध्ये अश्या खासगी संस्थांना बस्तान का मांडू दिले जात आहे ?

10. वरील सर्व कामांसाठी दरवर्षी पुरेशी आर्थिक तरतूद पालिकेच्या बजेट मध्ये करण्यात यावी.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा