पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : ऋषिपंचमीच्या पावन दिनी चिंचवड नगरीत भक्तिभावाचे दाट वातावरण अनुभवायला मिळाले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, संस्कृती संवर्धन व विकास महासंघ विभाग आणि चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व गजानन महाराज मंदिर यांच्या सहकार्याने सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले.
चिंचवडचे आराध्य दैवत श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या पवित्र वाड्यात सुमारे सातशे भाविकांनी एकत्र येऊन अथर्वशीर्ष पठणाचा आनंद घेतला. मंत्रोच्चार, शंखनाद व वेदघोषाने वातावरण पवित्र व मंगलमय झाले.
दीपप्रज्वलन सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे, गतीराम भोईर, माधुरी कवी व डॉ. अजित जगताप यांनी केले. गायत्री गणेश याग राजेंद्र देसले, लीलाधर भोळे व शांतीकुंज हरिद्वार गायत्री परिवाराच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. समारोप आरती भास्कर रिकामे, अपर्णा कुलकर्णी, उज्वला कवडे व सुषमा वैद्य यांच्या शुभहस्ते झाला.
ह.भ.प. किसन महाराज चौधरी, शिवानंद चौगुले व प्रवीण कोठावदे यांसारख्या मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला अधिक मंगलत्व प्राप्त झाले. अथर्वशीर्ष पठणाचे प्रमुख अनिल अढी, प्रिया जोग, अपर्णा कुलकर्णी व धनंजय कुलकर्णी होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हरिभाऊ क्षीरसागर, अश्विनी नाटेकर, अंजली कुलकर्णी, अर्चना डबीर, सुभाष चव्हाण, यशवंत देशपांडे, सोमेश्वर बारपांडे व संतोष शाहू यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले. शेवटी प्रसाद वितरणाने सोहळ्याची सांगता झाली.