- मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयातून दोन दिवसांत 415 हून अधिक अर्जांचे वितरण
- उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनंतर भाजपा इच्छुकांची अक्षरश: झुंबड
पिंपरी-चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आगामी निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आता भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. अवघ्या दोन दिवसांत पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयातून तब्बल 415 हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुकांची सर्वाधिक पसंती ‘कमळ’ आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
भाजपा नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळे सौदागर येथे आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर भाजपाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पक्षाच्या कार्यालयातून अर्ज घ्यावेत. ते जमा करुन छाननी व पडताळणी करावी आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी प्रदेश कार्यालयाकडे पाठवावेत, अशा सूचना स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांना दिल्या होत्या. उद्या, रविवार, दि. 7 डिसेंबरपर्यंत इच्छुकांसाठी अर्ज पार्टी कार्यालयातून मिळण्याची मुदत आहे.
भाजपाचे संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे म्हणाले की, मोरवाडी- पिंपरी येथील भाजपाच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयामध्ये शुक्रवारी दुपारी इच्छुक अर्ज वितरणासाठी सुरूवात केली. अवघ्या दोन दिवसांत तब्बल 415 हून अधिक उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत. उद्या शेवटचा दिवस आहे. ज्या मान्यवर इच्छुकांनी अर्ज घेणे अद्याप बाकी आहे. त्यांनी त्वरील अर्ज घ्यावेत.
किंबहुना, भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणूक इच्छुक अर्ज वितरण, अर्ज स्विकारणे आणि त्यानंतर पक्षाच्या विविध स्तरावरील सर्व्हेचा आधार घेवून उमेदवारी निश्चित केली जाते. पक्षश्रेष्ठींचे या प्रक्रियेवर बारीक लक्ष असते. सर्वच इच्छुकांनी अर्ज पक्षाच्या कार्यातून घ्यावेत, असे आवाहनही शेडगे यांनी केले आहे.
प्रतिक्रिया :
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपाने ‘‘अब की बार 100 पार...’’ असा नारा दिला आहे. पक्ष शिष्टाचार- शिस्त आणि संघटन ही पक्षाची बलस्थाने आहेत. पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार, शहरातील 32 प्रभागांमधील इच्छुकांचे अर्ज पक्षाच्या कार्यालयात वितरणाचे काम सुरू आहे. इच्छकांनी आरक्षणनिहाय अर्ज घ्यावेत. शहरात 128 जागा आहेत. पण, इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात झालेल्या विकासकामांवर व राष्ट्रहिताच्या निर्णयांमुळे भाजपावर लोकांचा विश्वास वृद्धींगत झाला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संघटन मजबूत केले असून, या निवडणुकीत पुन्हा एकदा विजयी पताका फडकवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.
- शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

