विचारधन

 


संकलन - शिवानंद चौगुले 

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कर्तृत्व, धैर्य आणि प्रशासनकौशल्याची ठाम मुद्रा उमटविणारे अजित दादा पवार यांचे आकस्मिक जाणे हे केवळ एका व्यक्तीचे देहावसान नसून, मनुष्यजन्माचा गूढ हेतू, कर्मयोगाची व्यापकता आणि मृत्यूचे शाश्वत सत्य यांचे स्मरण करून देणारे अंतःकरण हलवून टाकणारे निमित्त आहे; भारतीय तत्त्वज्ञानानुसार मनुष्यजन्म हा दुर्लभ असून तो भोगप्रधान जीवनासाठी नव्हे, तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुष्पुरुषार्थांचा समन्वय साधण्यासाठी प्राप्त होतो, म्हणूनच सृष्टीकर्त्याने मनुष्याला विवेकबुद्धी, आत्मचिंतनाची क्षमता आणि परोपकाराची प्रवृत्ती प्रदान केली आहे.

भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात — “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” — म्हणजे कर्म करणे हेच मनुष्याचे अधिष्ठान आहे, फलाची आसक्ती ही बंधनकारक ठरते, आणि जो व्यक्ती निष्काम भावनेने, समाजहिताची जाणीव ठेवून कार्यरत राहतो तोच अंतःकरणात स्थैर्य व शांती प्राप्त करतो; इतिहास आणि परंपरा साक्ष देतात की ज्यांनी स्वतःच्या सुखापेक्षा समाजाच्या हिताला प्रधान्य दिले, त्यांनीच लोकमानसात अढळ स्थान निर्माण केले, कारण सत्ता, संपत्ती आणि वैभव हे क्षणिक असून लोकांच्या हृदयात निर्माण झालेली श्रद्धा आणि विश्वास हीच खरी अमरता आहे; भौतिक सुखांच्या अतिरेकी पाठलागात मनुष्य नाती, समाधान आणि आत्मिक शांती हरवून बसतो, म्हणून उपनिषद ‘संतोष’ हाच परमसुखाचा मार्ग मानतात; कुटुंबवत्सलता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभक्ती ही केवळ सामाजिक मूल्ये नसून ती आध्यात्मिक साधनाच आहेत, कारण दुसऱ्याच्या वेदनेशी तादात्म्य साधणे हाच खरा धर्मभाव आहे

 मृत्यू हे अटल आणि अनिवार्य सत्य आहे, त्याची वेळ अज्ञात असल्यामुळे प्रत्येक क्षण सजगतेने, प्रत्येक श्वास कृतज्ञतेने आणि प्रत्येक कृती प्रामाणिकपणे जगणे हाच मनुष्यजीवनाचा सार्थक अर्थ आहे, कारण देह नश्वर असला तरी सद्कर्मांचे संस्कार कालातीत ठरतात, आणि जो मनुष्य आपल्या आचरणातून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करतो तो देहावसानानंतरही स्मृतीरूपाने चिरंतन राहतो — हेच जीवनाचे खरे, शाश्वत विचारधन आहे.

 ॐ नमः शिवाय

थोडे नवीन जरा जुने