सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अंमलबजावणीसाठी लढा तीव्र; मातंग समाजाचे नेते एकत्र
“सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा समाजासाठी न्याय मिळवून देणारा - दिपकभाऊ कसबे
पुणे : महाराष्ट्रातील अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मातंग समाजात मोठी चळवळ उभी राहत आहे. या पार्श्वभूमीवर मातंग समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आमदार अमित गोरखे यांची भेट घेऊन त्यांना ठाम पाठिंबा दर्शविला.
या भेटीदरम्यान पुणे शहर जिल्हा मातंग समाज उपवर्गीकरणाच्या लढ्यात पूर्ण ताकदीने उभा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. समाजातील सर्व स्तरांतील नेते, कार्यकर्ते आणि तरुणांनी एकत्र येत उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते शंकर भाऊ तडाखे आणि पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव दीपक भाऊ कसबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा समाजासाठी न्याय मिळवून देणारा आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे. यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो असून हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील.”
त्यांनी पुढे सांगितले की, उपवर्गीकरणामुळे समाजातील वंचित घटकांना न्याय मिळणार असून शिक्षण, नोकरी आणि सामाजिक संधींमध्ये समतोल साधला जाईल. त्यामुळे शासनाने कोणतीही दिरंगाई न करता निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, या चळवळीमुळे मातंग समाजात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
