ज्येष्ठ पत्रकार आणि कामगार नेते विनायक चक्रे यांचे निधन

 


पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ कामगार नेते आणि पत्रकार कॉम्रेड विनायक गंगाधर चक्रे (वय ७९) यांचे आज (१७ एप्रिल २०२६) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

ते संत तुकारामनगर येथील निवासस्थानी राहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

१९८०–९० च्या दशकात पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील कामगार चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बजाज ऑटो, टेल्को, बजाज टेम्पो, गरवारे नायलॉन्स यांसारख्या कंपन्यांतील कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी सक्रिय लढा दिला. डेव्हिड ब्राऊन ग्रीव्हज कंपनीतून बडतर्फ झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ कामगार चळवळीत स्वतःला वाहून घेतले.

वेतन करार, कामगारांचे प्रश्न आणि विविध संप-आंदोलनांमध्ये ते नेहमी आघाडीवर होते. पत्रकार म्हणूनही त्यांनी दैनिक सामना, लोकसत्ता आणि महाराष्ट्र हेराल्डमध्ये काम केले. ‘वरद विनायक’ या टोपणनावाने लोकसत्तामध्ये त्यांनी कामगार विषयक लेखन करून विशेष ओळख निर्माण केली.

त्यांच्या निधनामुळे प्रामाणिक, स्पष्टवक्ते कामगार नेते आणि धाडसी पत्रकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

त्यांच्यावर आज दुपारी ४ वाजता दापोडी येथील ख्रिश्चन दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

थोडे नवीन जरा जुने