शिर्डी (किशोर थोरात) : शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यान्वित होत असलेल्या निबे ग्रुपच्या अत्याधुनिक संरक्षण उत्पादन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम स्थळाची पाहणी करून तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. देशाचे संरक्षण मंत्री मा. श्री. राजनाथ सिंह यांच्या शुभहस्ते तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा बहुप्रतिक्षित लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनाची, सुरक्षा व्यवस्थेची, प्रदर्शन विभागाची तसेच मान्यवर आणि नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. संबंधित अधिकारी व आयोजकांना आवश्यक त्या सूचना देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना करण्यात आल्या.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या औद्योगिक, आर्थिक आणि रोजगारवाढीच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. संरक्षण साहित्य उत्पादन क्षेत्रात जिल्ह्याची स्वतंत्र आणि भक्कम ओळख निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प महत्वाची भूमिका बजावणार असून “मेक इन इंडिया” आणि “आत्मनिर्भर भारत” या केंद्र सरकारच्या संकल्पनांना मोठी बळकटी मिळणार आहे.
विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे दोन हजार युवकांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भविष्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढून स्थानिक उद्योग, पूरक व्यवसाय आणि आर्थिक विकासाला गती मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
लोकार्पण सोहळ्यानिमित्त संरक्षण उत्पादन क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्यांचे भव्य प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्वदेशी उत्पादन क्षमता आणि औद्योगिक नवसंकल्पनांचे दर्शन घडविणारे १०० हून अधिक MSME उद्योगांचे स्टॉल्स या प्रदर्शनात उभारण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक उद्योजक, युवक आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित घटकांना संरक्षण उत्पादन क्षेत्रातील नव्या संधी आणि आधुनिक तंत्रज्ञान जवळून अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
हा प्रकल्प केवळ औद्योगिक विकासाचा टप्पा नसून अहिल्यानगर जिल्ह्याला राष्ट्रीय संरक्षण उत्पादन क्षेत्राच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून देणारा महत्वाकांक्षी उपक्रम ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
