आठ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास "खड्ड्यांना भावपूर्ण श्रद्धांजली" आंदोलनाचा इशारा
पिंपरी चिंचवड : प्रभाग क्रमांक ११ मधील कृष्णा नगर, स्पाईन रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात याच खड्ड्यांच्या निषेधार्थ मारुती जाधव मित्रपरिवार यांच्या वतीने खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. यंदाही संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
महानगरपालिकेचा दावा आहे की शहरात केवळ ५६० खड्डे आहेत आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी वर्षभरात दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता हा निधी नेमका कुठे आणि कसा खर्च झाला, याची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
यासंदर्भात महानगरपालिकेला स्पष्ट इशारा देण्यात येत आहे की, पुढील आठ दिवसांत कृष्णा नगर व स्पाईन रोड परिसरातील सर्व खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात आली नाही, तर या खड्ड्यांना "भावपूर्ण श्रद्धांजली" अर्पण करण्याचे आंदोलन मोठ्या प्रमाणावर करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेची राहील.
महानगरपालिकेने नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून तातडीने खड्ड्यांची डागडुजी व दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मारुती जाधव यांनी केली आहे

