MGID Header Code
Code End

पे अँड पार्कच्या नावाखाली नागरिकांची लूट नको ! मूलभूत सुविधा देण्यात महापालिका अपयशी

 


पार्किंगसाठी शुल्क आकारण्याच्या महापालिकेच्या धोरणाला चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचा तीव्र विरोध

पिंपरी चिंचवड  : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात पुन्हा एकदा ‘पे अँड पार्क’ धोरण राबविण्याच्या हालचाली सुरू केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील नागरिकांना अद्याप पुरेशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. त्यातच पार्किंगच्या नावाखाली नागरिकांकडून शुल्क आकारण्याचा प्रयत्न म्हणजे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकण्याचा प्रकार असल्याचा आरोप चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनने केला आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले असून, ‘रस्त्यात खड्डे नाहीत, तर खड्ड्यातच रस्ते आहेत’, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असतानाही संबंधित ठेकेदारांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप फेडरेशनने केला आहे. पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, कचरा व्यवस्थापन, पार्किंग यांसह नागरिकांना आवश्यक असलेल्या विविध मूलभूत सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत.

आधी सुविधा द्या, मग शुल्क आकारा

महापालिकेने नागरिकांना दर्जेदार आणि पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना, विविध कारणांसाठी नागरिकांकडून शुल्क आकारण्याचे धोरण राबविणे योग्य नाही. स्वतःच्या शहरात वाहन पार्क करण्यासाठीही नागरिकांनी पैसे का द्यायचे, असा सवाल फेडरेशनने उपस्थित केला आहे. शहरातील उपलब्ध पार्किंग सुविधा शक्य तितक्या मोफत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

महापालिकेच्या तिजोरीत नागरिकांकडून विविध प्रकारचे कर आणि शुल्क जमा होत असताना त्याबदल्यात नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळणे आवश्यक आहे. मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम असताना त्यावर तोडगा न काढता ‘पे अँड पार्क’च्या माध्यमातून पुन्हा नागरिकांकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका फेडरेशनने घेतली आहे.

“नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था शक्यतो मोफतच असली पाहिजे. महापालिकेने पे अँड पार्क धोरण राबविण्यापूर्वी शहरातील रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आणि इतर मूलभूत प्रश्न सोडवावेत. नागरिकांना सुविधा न देता केवळ विविध शुल्कांच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा प्रकार फेडरेशन कदापि सहन करणार नाही. या धोरणाला आमचा तीव्र विरोध असून नागरिकांच्या हितासाठी फेडरेशन ठामपणे भूमिका मांडणार आहे,” असे सांगळे यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया 

“महापालिकेने आधी नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात. शहरातील रस्त्यांची अवस्था पाहिली तर अनेक ठिकाणी रस्ते आहेत की खड्डे, असा प्रश्न पडतो. निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांना पार्किंगसाठी पैसे भरण्यास भाग पाडणे योग्य नाही. नागरिकांकडून विविध करांच्या माध्यमातून पैसे घेतले जात असताना पार्किंगच्या नावाखाली पुन्हा शुल्क आकारणे म्हणजे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणे आहे.”

 संजीवन सांगळे ,

अध्यक्ष -चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे

थोडे नवीन जरा जुने