MGID Header Code
Code End

विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष ए. बालकृष्णन यांचे दुःखद निधन

 

कन्याकुमारी : विवेकानंद रॉक मेमोरियल आणि विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीचे अध्यक्ष माननीय श्री ए. बालकृष्णन जी यांच्या निधनाने विवेकानंद केंद्र परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल विवेकानंद रॉक मेमोरियल आणि विवेकानंद केंद्राच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

श्री ए. बालकृष्णन हे विवेकानंद केंद्राच्या सुरुवातीच्या काळातील जीवनव्रती कार्यकर्त्यांपैकी एक होते. संस्थापक माननीय एकनाथजी रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कार्याचे संस्कार घेतले. ईशान्य भारतापासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांना समर्पित भावनेने सेवा, त्याग आणि राष्ट्रकार्य केले.

विवेकानंद केंद्राचे महासचिव म्हणून १९८१ ते २००१, त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून २००१ ते २०२० आणि २०२० पासून अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली विवेकानंद केंद्राच्या विविध सेवा उपक्रमांना, विशेषतः विवेकानंद केंद्र विद्यालये आणि देशभरातील सेवा कार्यांना, मोठी चालना मिळाली.

साधे, शिस्तबद्ध आणि निःस्वार्थ जीवन जगणारे श्री. बालकृष्णन यांनी विवेकानंद केंद्राच्या ध्येयाशी आणि राष्ट्रसेवेशी अखंड निष्ठा ठेवली. त्यांचे कार्य आणि त्यांनी निर्माण केलेली प्रेरणा अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील.

त्यांच्या निधनाने राष्ट्रसेवा आणि समाजकार्याच्या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्र जनभूमी न्यूज परिवारातर्फे श्री ए. बालकृष्णन यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.

शिवानंद चौगुले

वार्ताहर, महाराष्ट्र जनभूमी न्यूज

थोडे नवीन जरा जुने