अहिल्यानगर : महाराष्ट्राच्या मातीतून मिळालेले संस्कार, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा सातासमुद्रापार पोहोचवत नीला विखे पाटील यांनी स्वीडनच्या राजकारणात महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. १३ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या स्वीडनच्या संसदीय निवडणुकीत त्यांची स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून स्वीडनच्या ३४९ सदस्यीय रिक्सडाग संसदेत खासदार म्हणून निवड झाली आहे. त्या स्वीडनच्या ग्रीन पार्टी (Miljöpartiet) शी संबंधित आहेत.
नीला विखे पाटील या महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या असून माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नाती आणि महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आहेत. विखे पाटील कुटुंबाची शिक्षण, सहकार आणि सार्वजनिक जीवनातील दीर्घ परंपरा त्यांच्या वाटचालीशी जोडलेली आहे.
स्वीडनमध्ये जन्मलेल्या नीला विखे पाटील यांच्या बालपणीचा काही काळ अहिल्यानगरमध्ये गेला. त्यामुळे स्वीडनच्या संसदेपर्यंत पोहोचलेली त्यांची वाटचाल ही महाराष्ट्र आणि स्वीडन यांच्यातील एका वेगळ्या नात्याचेही उदाहरण ठरली आहे. त्यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले असून व्यवस्थापन क्षेत्रातही उच्च शिक्षण घेतले आहे.
नीला विखे पाटील यांना स्वीडनच्या सार्वजनिक जीवनाचा यापूर्वीपासूनच अनुभव आहे. माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या कार्यकाळात त्यांनी स्वीडिश पंतप्रधान कार्यालयात वित्त, कर आणि गृहनिर्माण विषयांवर राजकीय सल्लागार म्हणून काम केले. तसेच त्यांनी स्टॉकहोम सिटी कौन्सिलमध्येही निवडून येत जबाबदारी सांभाळली आहे.
खासदार म्हणून काम करताना बालकांचे कल्याण आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची त्यांची भूमिका आहे. निवडीनंतर त्यांनी शहर आणि देशासाठी योगदान देण्याबाबत उत्साह व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण
अहिल्यानगरच्या मातीत बालपणीचे संस्कार घेतलेल्या नीला विखे पाटील यांनी स्वीडनच्या संसदेत स्थान मिळवणे ही महाराष्ट्रासाठी निश्चितच उल्लेखनीय बाब आहे. त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्रातील शिक्षण, सहकार आणि सार्वजनिक जीवनाची परंपरा आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाली आहे.
नीला विखे पाटील यांच्या स्वीडनच्या संसदेतील निवडीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील सार्वजनिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
— डॉ. किशोर आण्णासाहेब थोरात
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ
संस्थापक अध्यक्ष, श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था, पुणे
