MGID Header Code
Code End

माणुसकी दाखवूनही एक समाजसेवा होऊ शकते

 


— डॉ. किशोर आण्णासाहेब थोरात

पिंपरी चिंचवड  : समाजसेवा म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर मोठे उपक्रम, मदतकार्य, रक्तदान, गरजू विद्यार्थ्यांना मदत, वृक्षारोपण किंवा मोठमोठे सामाजिक कार्यक्रम उभे राहतात. पण खरं तर समाजसेवा नेहमी मोठ्या व्यासपीठावरच करावी लागते असे नाही. एखाद्या अनोळखी व्यक्तीची अडचण समजून घेऊन, कोणताही स्वार्थ न ठेवता केलेली छोटीशी कृतीसुद्धा समाजसेवाच असते. याचाच एक छोटासा, पण माझ्या मनाला कायम लक्षात राहणारा अनुभव शुक्रवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी रात्री मला आणि माझ्या कुटुंबाला आला. मी आणि माझे कुटुंब चिखली परिसरातून येत असताना हॉटेल शिदोरी महलजवळ आम्हाला ओप्पो कंपनीचा एक मोबाईल फोन पडलेला आढळला. रात्रीची वेळ होती. क्षणभर विचार आला की हा मोबाईल कोणाचा असेल? पण लगेच मनाने सांगितले—हा मोबाईल आपला नाही; तो ज्याचा आहे, त्याच्यापर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. आम्ही तो मोबाईल घरी आणला आणि संबंधित व्यक्तीचा फोन येण्याची वाट पाहू लागलो.


रात्री साधारण साडेबारा वाजण्याच्या सुमारास श्री. संतोष शिंदे यांचा फोन आला. आम्ही त्यांना सांगितले, “आपला मोबाईल आमच्याकडे सुरक्षित आहे. आपण तो घेऊन जाऊ शकता.” त्यानंतर आम्ही लोकेशन त्यांना पाठवले. रात्रीची वेळ असूनही ते आपल्या सहकाऱ्यांसोबत ठीक रात्री १ वाजता माझ्या घराजवळ आले आणि त्यांचा मोबाईल त्यांना सुरक्षितपणे परत केला.

मोबाईल हातात घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि त्यांनी व्यक्त केलेले कौतुक—हीच आमच्यासाठी खरी कमाई होती.त्या क्षणी मनात एक विचार आला—“आयुष्यात कितीही मोठे पुरस्कार मिळाले, कितीही सन्मान मिळाले, कितीही मोठी पदे मिळाली, तरी एखाद्या माणसाच्या अडचणीच्या क्षणी त्याच्या उपयोगी पडण्याचे समाधान त्याहून मोठे असू शकते का?” कदाचित नाही.

कारण तो मोबाईल केवळ एक वस्तू नव्हती. त्या मोबाईलमध्ये त्या व्यक्तीचे संपर्क क्रमांक, आठवणी, आवश्यक माहिती, कामाशी संबंधित डेटा आणि कदाचित त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अनेक गोष्टी असू शकतात. मोबाईलची बाजारातील किंमत किती आहे, यापेक्षा तो मोबाईल त्याच्या मालकासाठी किती महत्त्वाचा आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे.

म्हणूनच तो मोबाईल परत करणे आम्हाला गरजेचे वाटले. हीच खरी संस्कारांची शिदोरी! आपण आपल्या मुलांना काय शिकवतो?

प्रामाणिकपणा, दुसऱ्याच्या वस्तूवर हक्क न सांगणे, गरजूंना मदत करणे, संकटात असलेल्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणे आणि “आपल्याला जे नको ते दुसऱ्याचेही नको” ही भावना. हीच खरी संस्कारांची शिदोरी आहे.

आज समाजात अनेक प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी मोठमोठे उपक्रम करण्याची गरज नसते. कधी एखाद्याला रस्ता दाखवणे, वृद्ध व्यक्तीला आधार देणे, हरवलेली वस्तू मालकापर्यंत पोहोचवणे, गरजूला वेळ देणे—या छोट्या कृतींमधूनही माणुसकी जिवंत ठेवता येते.

समाजसेवा म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी केलेले कार्य नव्हे; समाजसेवा म्हणजे समोरच्या माणसाच्या वेदनेला आणि गरजेला स्वतःची समजण्याची वृत्ती.

आज माझ्या सामाजिक कार्याच्या प्रवासात अनेक पुरस्कार, सन्मान आणि गौरव मिळाले आहेत. पण अशा प्रसंगातून मिळणारे समाधान वेगळेच असते. कारण येथे कोणताही मंच नाही, कोणताही सत्कार नाही, कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा नाही—फक्त माणुसकी आहे.

श्री. संतोष शिंदे यांनी व्यक्त केलेले मनापासूनचे आभार आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून एक गोष्ट पुन्हा प्रकर्षाने जाणवली—

“माणुसकी जपली तर समाज आपोआप सुंदर होतो.” आपण प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात अशी छोटीशी माणुसकी जपण्याचा प्रयत्न केला, तर समाजात मोठा सकारात्मक बदल घडू शकतो.

कारण शेवटी—

पदापेक्षा माणूस मोठा,

पैशापेक्षा माणुसकी मोठी,

पुरस्कारापेक्षा समाधान मोठे,

आणि प्रसिद्धीपेक्षा प्रामाणिकपणा मोठा!

हीच शिकवण आम्हाला आमच्या संस्कारांनी दिली आणि समाजाप्रती असलेली हीच बांधिलकी आम्ही पुढेही जपण्याचा प्रयत्न करू.माणुसकी दाखवण्यासाठी मोठे होण्याची गरज नाही;मोठ्या मनाची गरज असते.


— डॉ. किशोर आण्णासाहेब थोरात

थोडे नवीन जरा जुने