MGID Header Code
Code End

ललितापंचमीला सामुदायिक श्रीसूक्त पठण भक्तिमय वातावरणात

 


आकुर्डीतील श्री तुळजाभवानी मंदिरात ५०० भाविकांचा सहभाग; स्त्रीशक्ती व स्त्रीजागरणावर भारतीताई तारे यांचे मार्गदर्शन

पिंपरी चिंचवड : ललितापंचमीच्या शुभमुहूर्तावर आकुर्डी येथील ऐतिहासिक श्री तुळजाभवानी मंदिरात गुरुवारी (दि. १५) सामुदायिक श्रीसूक्त पठणाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या संस्कृती संवर्धन व विकास महासंघ विभागाच्या पुढाकाराने आणि श्री तुळजाभवानी देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात सुमारे ५०० भाविकांनी सहभाग घेतला. शंखनाद, दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, सामुदायिक श्रीसूक्त पठण आणि महाआरतीने मंदिर परिसरात आध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले.

आकुर्डी येथील श्री तुळजाभवानी माता मंदिर हे परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सुमारे ४५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यातील सामुदायिक श्रीसूक्त पठण हा विशेष उपक्रम असून, यंदा या उपक्रमाचे बारावे वर्ष होते. 'हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्...' या श्रीसूक्तातील मंगलमय मंत्रोच्चारांनी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर केशव शंखनाद पथकाने सादर केलेल्या विलोभनीय शंखनादाने वातावरणात चैतन्य निर्माण केले. उपस्थित भाविकांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत सामुदायिक श्रीसूक्त पठण केले. यावेळी श्रीसूक्त पठणाच्या माध्यमातून सुख, समृद्धी, शांती आणि सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करण्यात आली.

कार्यक्रमाच्या विशेष अतिथी भारतीताई तारे यांनी स्त्रीशक्ती आणि स्त्रीजागरण या विषयांवर मार्गदर्शन केले. समाजाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान महत्त्वाचे असून, महिलांनी आपल्या सामर्थ्याची जाणीव ठेवून कुटुंब, समाज आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. धार्मिक परंपरा आणि सामाजिक जागृती यांची सांगड घालणाऱ्या अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास आणि संघभावना वाढण्यास मदत होते, असा विचारही त्यांनी मांडला.

ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. अजित जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत करत सुत्रसंचालन केले.  श्रीसूक्त पठणाचे व्यासपीठ संचालन अर्चना सोनार, माधुरी कवी, माधुरी ओक, ज्योती कानिटकर, सुषमा वैद्य, सुचेता गटणे, उज्ज्वला केळकर, दिपाली खासनिस आणि प्रतिभा पेंडसे यांनी केले. तर शिवानंद चौगुले यांनी आभार मानले. मान्यवरांमध्ये श्री नारायण देशपांडे, नरहरी वाघ, भास्कर रिकामे, हरीभाऊ क्षीरसागर, राजेंद्र पाटील, सुभाष चव्हाण, शांताराम दामगुडे, रविंद्र बराटे, लिलाधर भोळे आदी उपस्थित होते. 

याप्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीने धनंजय काळभोर, वैष्णवी काळभोर, आदिती काळभोर, प्रिया काळभोर, मल्हारी काळभोर , शिवदत्त काळभोर आणि ताराचंद काळभोर उपस्थित होते. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या संस्कृती संवर्धन व विकास महासंघ विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

धार्मिक श्रद्धा, सामुदायिक उपासना आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन या त्रिसूत्रीवर आधारित या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देवीची महाआरती आणि प्रसादवाटपाने कार्यक्रमाची सांगता झाले.

थोडे नवीन जरा जुने