MGID Header Code
Code End

स्वदेशा हाउसिंग सोसायटीच्या पाणी प्रश्नावर फेडरेशनचा विकसकाच्या कार्यालयावर धडक मोर्चा

 

प्रत्येक फेजसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी द्या ; महापालिकेचा पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईपर्यंत विकसकांनीच पाण्याची व्यवस्था करावी, फेडरेशनची मागणी

पिंपरी चिंचवड : स्वदेशा हाउसिंग सोसायटीमधील गंभीर पाणी प्रश्नावर अखेर सोसायटीधारकांचा संताप रस्त्यावर आला. पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने विकसकाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात फेडरेशनचे पदाधिकारी, महिला भगिनी तसेच सोसायटीधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रत्येक फेजसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी उपलब्ध करून द्यावी, तसेच महापालिकेकडून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत विकसकानेच पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली.

सोसायटीधारकांना त्यांच्या मूलभूत गरजेच्या पाण्यासाठी वारंवार विकसकाकडे पाठपुरावा करावा लागत असल्याने फेडरेशनने तीव्र नाराजी व्यक्त केली. मामासाहेब मोरे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक व्यवस्था करणे ही विकसकाची जबाबदारी असल्याची भूमिका फेडरेशनने मांडली. प्रत्येक फेजला स्वतंत्र पाण्याची टाकी उपलब्ध करून देण्यासोबतच आतापर्यंत पाण्यावर सोसायटीधारकांनी केलेला खर्च विकसकांनी परत करावा, अशीही मागणी करण्यात आली.

मोर्चानंतर विकसकांसोबत सविस्तर बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व बाबींची नोंद करून पाण्याची मुख्य पूर्तता होईपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देण्यात येणार नसल्याचे सांगितल्याचा दावा फेडरेशनने केला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत संबंधित प्रकल्पाच्या बांधकामाबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी फेडरेशनने केली.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी सोसायटीधारकांना स्वखर्चाने पाणीपुरवठा करण्याबाबत महापालिकेकडे हमीपत्रे दिल्याचा दावा फेडरेशनने केला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित हमीपत्रांची अंमलबजावणी होत आहे की नाही, याची महापालिका प्रशासनाने तपासणी करावी आणि अटींचे उल्लंघन करणाऱ्या विकसकांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यापूर्वीही या प्रश्नावर महापालिका आयुक्तांकडे निवेदने देण्यात आल्याचे फेडरेशनने सांगितले.

फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वदेशा हाउसिंग सोसायटीचे चेअरमन निलेश खांडगे पाटील, पदाधिकारी, महिला भगिनी आणि मोठ्या संख्येने सोसायटीधारक या मोर्चात सहभागी झाले. “पाणी हा कोणाचाही उपकार नसून सोसायटीधारकांचा मूलभूत प्रश्न आहे. विकसक आणि प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा; अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” अशी भूमिका फेडरेशनच्या वतीने घेण्यात आली.

पालिका अधिकाऱ्यांकडून ‘प्रतिक्रियेची’ प्रतीक्षा

दरम्यान, या गंभीर पाणी प्रश्नावर महापालिका प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी शहर अभियंता प्रमोद ओंबासे यांच्याशी संपर्क साधला असता, “मी गेल्या बारा दिवसांपासून सुट्टीवर होतो. आजच दुपारी सेवेत रुजू झालो आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ प्रतिक्रिया देता येणार नाही,” असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भोसले विजयसिंह यांच्याशी संपर्क साधला असता, “संपूर्ण माहिती पाठवा, त्यानंतर मी याबाबत प्रतिक्रिया देतो,” असे त्यांनी सांगितले. त्यानुसार संबंधित प्रकरणाची संपूर्ण माहिती त्यांना पाठविण्यात आली. मात्र, त्यानंतर त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यामुळे सोसायटीधारकांच्या पाणी प्रश्नावर महापालिका प्रशासनाची नेमकी भूमिका काय, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

प्रतिक्रिया :

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच बांधकाम व्यावसायिकांनी महानगरपालिकेकडे सोसायटीधारकांना स्वखर्चाने पाणीपुरवठा करण्याबाबत हमीपत्र दिलेले आहे. या हमीपत्राच्या आधारेच संबंधित बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देण्यात आले आहेत. मात्र, या हमीपत्रातील अटींचे सरळसरळ उल्लंघन करून सोसायटीधारकांवर पाणीपुरवठ्याचा आर्थिक भार टाकला जात आहे. याबाबत आम्ही वारंवार महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदने देऊनही ठोस कारवाई झालेली नाही. पिंपरी-चिंचवड तसेच पुणे जिल्ह्यातील विविध सोसायटी फेडरेशनच्या वतीने संयुक्तपणे माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. माननीय उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्त तसेच महानगरपालिका आयुक्तांना संबंधित प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.

तरीदेखील संबंधित विकसकांवर अपेक्षित कारवाई होत नसल्याने मनपा प्रशासनाकडून विकसकांना पाठीशी घातले जात असल्याची भावना सोसायटीधारकांमध्ये निर्माण झाली आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन हमीपत्रातील अटींचे उल्लंघन करणाऱ्या विकसकांची चौकशी करावी आणि लागू असलेल्या कायद्यानुसार, तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी. सोसायटीधारकांना त्यांच्या हक्काचा पाणीपुरवठा मिळेपर्यंत सोसायटी फेडरेशनचा हा लढा सुरूच राहील.

– संजीवन सांगळे

अध्यक्ष, सोसायटी फेडरेशन

प्रतिक्रिया :

आमच्या सोसायटीतील सभासदांना नियमानुसार पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत आम्ही संबंधित बिल्डरकडे वारंवार विनंती करून सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, आमच्या मागणीकडे बिल्डरकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नाईलाजास्तव आज सोसायटीतील सर्व महिला भगिनी, सभासद आणि रहिवाशांना सोबत घेऊन बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा काढावा लागला. पाणी ही प्रत्येक कुटुंबाची मूलभूत गरज असूनही त्यासाठी रहिवाशांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, ही खेदाची बाब आहे. आजच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार आणि ठरल्याप्रमाणे आमच्या बिल्डरने सोसायटीला नियमानुसार पाणीपुरवठा करण्याची आवश्यक व्यवस्था तातडीने करावी. अन्यथा, आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास सोसायटीधारकांच्या हक्कासाठी आम्हाला पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल.

– श्री. निलेश खांडगे पाटील, अध्यक्ष, स्वदेशा सहकारी गृहरचना संस्था

थोडे नवीन जरा जुने