MGID Header Code
Code End

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी व एसआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी घरकुल, चिखली येथे तीव्र निदर्शने


पिंपरी चिंचवड : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), पिंपरी-चिंचवड शहर समितीच्या वतीने निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह एसआयआर (SIR) प्रक्रिया रद्द करण्यासाठी घरकुल, चिखली येथील मेन गेटवर तीव्रनिदर्शने करण्यात आली. या वेळी “ज्ञानेश कुमार यांना अटक करा”, “नरेंद्र मोदी, अमित शहा राजीनामा द्या”, “आरएसएस-भाजपा सरकार चले जाओ”,संविधान विरोधी एसआयआर चालणार नाही” आणि “एसआयआर रद्द करा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

या आंदोलनात भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे, अपर्णा दराडे, कॉम्रेड सचिन एम. आर., अविनाश लाटकर, भार्गवी लाटकर, जनवादी महिला संघटनेच्या जयश्री साळोखे व सुषमा इंगोले, सुरेश बावनकर, गोकुळ बंगाळ, पोनाप्पण, एस. के. विश्वनाथन, सतीश नायर यांच्यासह घरकुल परिसरातील लोकशाहीप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.


यावेळी बोलताना कॉम्रेड गणेश दराडे यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी केली.

कॉम्रेड सचिन एम. आर. यांनी मोदी सरकारवर टीका करताना, सरकार चोरीच्या मतांच्या आधारावर निवडून आले असल्याचा आरोप केला आणि नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देऊन देशाला गुलामगिरीतून मुक्त करावे, अशी मागणी केली.

अपर्णा दराडे यांनी वाढत्या महागाईवरून भाजपा सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, महागाई प्रचंड वाढली असून, त्याला भाजपा सरकार जबाबदार आहे. या महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकार नागरिकांचा मतदानाचा व नागरिकत्वाशी संबंधित हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या अन्यायकारक धोरणांविरोधात संघर्ष सुरूच ठेवण्यात येईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सुरेश बावनकर यांनी कविता सादर करून आंदोलनाला बळ दिले. भविष्यातही भाजपा सरकारच्या धोरणांविरोधात पिंपरी-चिंचवड शहरात व्यापक आंदोलने उभारण्याचा निर्धार भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)च्या वतीने व्यक्त करण्यात आला. विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडत आंदोलनाची सांगता करण्यात आली.

— भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)

पिंपरी-चिंचवड शहर समिती

थोडे नवीन जरा जुने