MGID Header Code
Code End

महात्मा फुले नगरमध्ये पिण्याच्या पाण्याची प्रचंड गळती!

 


लाखो लिटर पाणी रस्त्यावर; कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले यांची मागणी

पिंपरी चिंचवड| वार्ताहर : शिवानंद चौगुले | महाराष्ट्र जनभूमी न्यूज

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कृष्णानगर प्रभाग क्रमांक ११ अंतर्गत येणाऱ्या महात्मा फुले नगरमधील प्रवेशद्वाराजवळ, हॉटेल शिवशंकर परिसरात पिण्याच्या पाण्याच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या गळतीमुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याचे चित्र असून, एकीकडे पाणी बचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या समस्येबाबत संबंधित अधिकारी श्री. गुजर यांना कळविण्यात आले आहे. मात्र, यापूर्वीही याच ठिकाणी अनेकदा पाण्याची गळती झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता संबंधित जलवाहिनीची तांत्रिक तपासणी करून गळतीचे मूळ कारण शोधावे आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले यांनी केली आहे.

पिण्याचे पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून, प्रत्येक थेंबाचे महत्त्व लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने अशा समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. वारंवार एकाच ठिकाणी गळती होत असेल, तर संबंधित जलवाहिनीची अवस्था, दुरुस्तीची गुणवत्ता आणि देखभाल यांची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे.

महानगरपालिका प्रशासनाने तातडीने गळती थांबवून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 प्रशासनाला सवाल : पाणी वाचवण्याचे आवाहन करणाऱ्या महानगरपालिकेकडूनच पाण्याची नासाडी रोखण्यासाठी ठोस पावले कधी उचलली जाणार?

थोडे नवीन जरा जुने