पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे रॅपिडोला सेवा थांबवण्याचे आदेश; जिल्हाधिकारी कार्यालयात झाली संयुक्त बैठक
पुणे/पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 'रॅपिडो' (Rapido) कंपनीच्या वतीने बेकायदेशीररीत्या टू-व्हीलर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. या मनमानी कारभाराला विरोध करत, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया आणि ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांना निवेदन देऊन ही सेवा बंद करण्याची मागणी करण्यात आली होती.
या निवेदनाची गंभीर दखल घेत, आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी, विविध रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी आणि ओला-उबेर-रॅपिडो कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत 'रॅपिडो' कंपनीने टू-व्हीलर टॅक्सी चालवण्यासाठी शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नसल्याची बाब समोर आली. विनापरवाना बेकायदेशीरपणे सेवा चालवल्याबद्दल, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी रॅपिडो कंपनीला तात्काळ ऑपरेशन्स थांबवून टू-व्हीलर टॅक्सी सेवा बंद करण्याचे सक्त आदेश दिले आहेत.
बैठकीला उपस्थित अधिकारी:
या महत्त्वपूर्ण बैठकीला पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) अर्चना गायकवाड, परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव आणि पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख - यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भांडवलदार कंपन्यांकडून गरिबांचे शोषण:
यावेळी प्रशासनासमोर आपली भूमिका मांडताना गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते, '' डॉ. बाबा कांबळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "ओला आणि उबेरसारख्या भांडवलदार कंपन्या नेहमीच ऑटो-टॅक्सी चालकांची पिळवणूक करत आहेत. केवळ नफा कमवण्याच्या उद्देशाने या कंपन्या गोरगरीब चालकांचे आर्थिक शोषण करत आहेत. प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे आणि नियमांचे या कंपन्यांकडून सातत्याने उल्लंघन होत आहे. त्यामुळे नियमांची पायमल्ली करून मनमानी करणाऱ्या या सर्व कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत."
या बैठकीला आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रिक्षा संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'माऊली' डॉ. बाबा कांबळे
संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया
